विकासाची शक्ती ही बॅाम्ब अन् बंदुकीच्या शक्तींपेक्षा जास्त मोठी- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 03:05 PM2019-07-28T15:05:45+5:302019-07-29T06:55:00+5:30
जम्मू- काश्मीरमधील रहिवाशांना विकास हवा आहे आणि देशाचा विकास वाढवण्यासाठी लोकांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज जनतेशी मन की बात केली आहे. जम्मू- काश्मीरमधील रहिवाशांना विकास हवा आहे आणि देशाचा विकास वाढवण्यासाठी लोकांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. तसेच चांद्रयान २ हे संपूर्ण देशाचे मिशन असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी झालेल्या 'मन की बात' कार्यक्रमात सांगितले. त्यांनी या कार्यक्रमात विविध विषयांवर चर्चा केली.
या कार्यक्रमात त्यांनी जम्मू- काश्मीरचा विकास, चांद्रयान 2 मिशन, पूरस्थितीबद्दलच्या विषयांचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे पूर आल्यामुळे नुकसान झालेल्या लोकांना केंद्र सरकार व राज्य सरकार एकत्र मिळून यावर काय उपाययोजना करता येईल, याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी सांगितले की, 'बॅक टू व्हिलेज' कार्यक्रमाला आणखी रंगतदार बनविण्यासाठी इतर कार्यक्रमांचे देखील आयोजन केले आहे. तसेच ज्याठिकाणी पोहोचण्यासाठी पायी चालत जाण्यास एक दिवस लागतो, अशा ठिकाणी अधिकारी या कार्यक्रमाच्या अंतर्गत पोहोचू शकतील. शोपियान, पुलवामा, कुलगाव, अनंतनाग यांसारख्या गावांमध्ये अधिकाऱ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केल्याचे त्यांना सांगितले. विकासाची शक्ती ही बॅाम्ब- बंदूकांच्या शक्तींपेक्षा जास्त मोठी आहे आणि जे लोक द्वेष पसरवतात ते कधीच यशस्वी होत नसल्याचे त्यांनी सांगितले. अंतराळाचा विचार केला तर 2019 हे वर्ष देशासाठी चांगले गेले आहे. मार्च महिन्यात एसॅट लॅान्च केले होते व जुलैमध्ये चांद्रयान 2 लाँचिंग झाले.
PM Narendra Modi in #MannKiBaat: This also proves that development is more powerful than guns and bombs. It is clear that those who want to create hatred & stall development will never succeed in their nefarious designs. https://t.co/GLSZuUHTub
— ANI (@ANI) July 28, 2019
देशातील विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तराच्या स्पर्धेद्वारे श्रीहरिकोटा येथे नेलं जाईल. प्रश्नोत्तर स्पर्धेत चांगले क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रीहरिकोटा येथे 7 डिसेंबर रोजी चांद्रयान-२ ची लँडिंग पाहण्यासाठी नेलं जाईल असंही मोदींनी सांगितलं. याशिवाय क्रीडास्पर्धांमध्ये देशासाठी पदक जिकणाऱ्या खेळाडूंचही मोदींनी कौतुक केलं आणि देशासाठी सन्मानाची व अभिनामानाची बाब असल्याचं ते म्हणाले.
दरमहिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधत असतात. मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर या कार्यक्रमाचे ५३ भाग प्रसारित झाले होते. मोदींच्या पहिल्या कार्यकाळातील अखेरचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम २४ फेब्रुवारी रोजी प्रसारित करण्यात आला होता.