भारतीय महिलेचा पराक्रम; पाच दिवसांत दोन वेळा ‘एव्हरेस्ट’ सर
By admin | Published: May 22, 2017 03:32 AM2017-05-22T03:32:16+5:302017-05-22T03:32:16+5:30
भारतीय गिर्यारोहक अंशू जमसेनपा हिने जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट पाच दिवसांत दोनवेळा सर करून रविवारी इतिहास घडविला
इटानगर : भारतीय गिर्यारोहक अंशू जमसेनपा हिने जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट पाच दिवसांत दोनवेळा सर करून रविवारी इतिहास घडविला. दोन अपत्यांची आई असलेली अंशू (वय ३२) १६ मे रोजी माऊंट एव्हरेस्ट सर करून परतली होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळी तिने पुन्हा चढाई सुरू करून नेपाळी गिर्यारोहक फुरी शेरपा याच्या साथीने रविवारी सकाळी आठ वाजता पुन्हा माऊंट एव्हरेस्ट तिरंगा फडकावला. या दोन वेळा मिळून तिने आतापर्यंत पाच वेळा एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे. याआधी एकाच हंगामात दोनदा एव्हरेस्टवर पोहोचण्याचा विक्रम छुरिम शेरपा या नेपाळी महिलेने सन २०१२ मध्ये केला होता. अंशूने तो विक्रम रविवारी मोडला. अंशू अरुणाचल प्रदेशची गिर्यारोहक आहे.
यापूर्वी १६ मे रोजी सकाळी सव्वानऊ वाजता तिने एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली होती. त्यानंतर रविवारी सकाठी आठ वाजता ती एव्हरेस्टवर पोहोचली. पाच दिवसांत दोन वेळा माऊंट एव्हरेस्ट सर करणारी जगातील पहिली महिला बनण्याचा मान तिने मिळविला. याशिवाय एव्हरेस्ट पाचव्यांदा सर करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. २०११ मध्ये तिने १० दिवसांत दोनवेळा हे शिखर सर केले होते. त्यानंतर २०१३ मध्ये तिने नेपाळच्या बाजूने एव्हरेस्टवर चढाई केली होती. तिने एव्हरेस्टकडे कूच केल्यानंतर अरुणाचलमध्ये अनेक बौद्ध मठ, मंदिरात तिच्या यशासाठी प्रार्थना करण्यात आल्या. अंशूच्या दुसऱ्या चढाई पर्वाला तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा यांनी गुवाहाटी येथे हिरवी झेंडी दाखविली होती. (वृत्तसंस्था)
यशस्वी चढाईनंतर भारतीय गिर्यारोहक बेपत्ता, उतरताना संपर्क तुटला
काठमांडू : माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करून परतताना भारतीय गिर्यारोहक बेपत्ता झाल्याची माहिती नेपाळमधील अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. रवी कुमार असे या गिर्यारोहकाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथील रहिवासी आहे. रवी कुमार खाली येत असताना बाल्कनी भागात त्याचा संपर्क तुटला. गिर्यारोहकांनी दक्षिण शिखरावर चढाई करण्यापूर्वीच्या अंतिम विश्राम थांब्याला बाल्कनी भाग म्हणतात. अरुण ट्रेकचे व्यवस्थापकीय संचालक चेवांग शेरपा म्हणाले की, रवी कुमारने शनिवारी दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी यशस्वीरीत्या एव्हरेस्ट सर केले.