वीज महागणार? आयात कोळशाच्या महागाईचा बोजा ग्राहकांवर टाकण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 12:07 PM2022-04-20T12:07:26+5:302022-04-20T12:08:29+5:30
power ministry : वीज मंत्रालयाने उच्च किंमतीच्या आयातित कोळशाचा भार ग्राहकांवर टाकण्याच्या निर्णयाला समर्थन दिले आहे. म्हणजेच येत्या काळात वीज आणखी महाग होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशात वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाल्याने वीज केंद्रे ठप्प पडण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, देशांतर्गत कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज संकट अधिक गडद होण्याची भीती असताना, वीज मंत्रालयाने उच्च किंमतीच्या आयातित कोळशाचा भार ग्राहकांवर टाकण्याच्या निर्णयाला समर्थन दिले आहे. म्हणजेच येत्या काळात वीज आणखी महाग होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोळशाचा तुटवडा आहे.
डिसेंबर 2022 पर्यंत काही कोळशावर आधारित वीज प्रकल्पांसाठी आयात केलेल्या कोळशाची उच्च किंमत ग्राहकांना देण्याचे मान्य करण्यात आले आहे, असे केंद्रीय ऊर्जा सचिव आलोक कुमार यांनी सांगितले. तसेच, ते म्हणाले की आयात केलेले कोळसा आधारित वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालले नाहीत तर विजेच्या वाढत्या मागणीमुळे देशांतर्गत कोळशावर आधारित युनिट्सवर दबाव येईल.
विजेची उपलब्धता वाढण्याची अपेक्षा
दरम्यान, अदानी समूह, टाटा पॉवर आणि एस्सार यांसारख्या आयातित कोळशावर आधारित युनिट्स वीज निर्मिती करून राज्य वितरण कंपन्यांना विकण्यास सक्षम असल्याने या निर्णयामुळे विजेची उपलब्धता वाढण्यास मदत होईल. तसेच, या महिन्याच्या सुरुवातीला ऊर्जा मंत्री आर के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत एस्सारचा 1,200 मेगावॅटचा सलाया प्लांट आणि अदानीचा 1,980 मेगावॅटचा मुंद्रा येथील प्लांट यांचा समावेश करताना आयात केलेल्या कोळशाचा उच्च खर्च ग्राहकांवर टाकण्यावर सहमती दर्शविली होती.