G20 परिषदेत दिसणार UPI ची पॉवर, परदेशी पाहुण्यांच्या वॉलेटमध्ये दिले जाणार 1000 रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 07:43 PM2023-09-06T19:43:11+5:302023-09-06T19:43:19+5:30
भारतात विकसित झालेल्या UPI चा जगभरात प्रचार-प्रसार करण्यासाठी सरकारने अनोखी योजना आखली आहे.
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत होणाऱ्या G20 शिखर परिषदेसाठी अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख येणार आहेत. त्यांच्यासोबत त्या-त्या देशाचे एक शिष्टमंडळदेखील असेल. या शिष्टमंडळासाठी केंद्र सरकारने एक निर्णय घेतला आहे. हे शिष्टमंडळ दिल्लीत विविध ठिकाणी फिरायला जाईल, तेव्हा त्यांना UPI द्वारे सहज पेमेंट करता यावे, यासाठी सरकारकडून त्यांच्या UPI वॉलेटमध्ये 1,000 रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाणार आहे.
UPI तंत्रज्ञानाने देशात कॅशलेस व्यवहारात खूप मोठा बदल घडवला आहे. ऑगस्ट महिन्यात UPI च्या माध्यमातून देशात 10 अब्जाहून अधिक व्यवहार झाले. आता भारत सरकारला हे डिजिटल पेमेंट सोल्यूशन जगभरात लोकप्रिय करायचे आहे. यासाठी G20 परिषदेचा पुरेपूर फायदा घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर 1,000 परदेशी पाहुण्यांना UPI चा अनुभव घेण्याची संधी दिली जाणार आहे.
UPI वॉलेटमध्ये पैसे जमा केले जातील
एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, UPI चा अनुभव घेण्यासाठी सरकार परदेशी प्रतिनिधींना आणि सहभागींना त्यांच्या वॉलेटमध्ये 500 ते 1000 रुपयांची रक्कम देणार आहे. हे सर्व लोक त्यांच्या फोनवरुन वेगवेगळ्या ठिकाणी UPI पेमेंट करू शकतील. UPI ला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने या उपक्रमासाठी 10 लाख रुपयांचे बजेट ठेवले आहे.
UPI अनेक देशांमध्ये लोकप्रिय
भारतात यशस्वी झाल्यानंतर UPI आता परदेशातही पोहोचत आहे. श्रीलंका, फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती आणि सिंगापूर यांनी UPI च्या वापरासाठी भारतासोबत करार केला आहे. हे सर्व देश स्वस्त, सुलभ पेमेंट टूल वापरण्यास उत्सुक आहेत. दुसरीकडे, या वर्षाच्या सुरुवातीला अर्थ मंत्रालयाने परदेशातून भारतात येणाऱ्या पर्यटकांना UPI पेमेंट करण्याची परवानगी दिली आहे. ते भारतातील प्रवासादरम्यान UPI पेमेंट करू शकतात.