अनेक पक्षांमुळे मतांच्या फाटाफुटीवरच ठरणार पंजाबमधील सत्तेचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 05:35 AM2019-02-06T05:35:21+5:302019-02-06T05:35:45+5:30

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने फारशी अपेक्षा न ठेवलेले आणि काँगे्रसला अच्छे दिन दाखवणारे राज्य म्हणून पंजाबकडे पाहिले जाते.

The power of Punjab in many phases will be considered by many parties | अनेक पक्षांमुळे मतांच्या फाटाफुटीवरच ठरणार पंजाबमधील सत्तेचे गणित

अनेक पक्षांमुळे मतांच्या फाटाफुटीवरच ठरणार पंजाबमधील सत्तेचे गणित

Next

- मनीषा मिठबावकर

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने फारशी अपेक्षा न ठेवलेले आणि काँगे्रसला अच्छे दिन दाखवणारे राज्य म्हणून पंजाबकडे पाहिले जाते. काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल या दोन तुल्यबळ पक्षांसोबतच वेगवेगळ्या आघाड्या आणि ‘आप’सह अन्य छोट्या पक्षांनी शड्डू ठोकल्याने मतांची किती फाटाफूट होते, यावरच तेथील निवडणूक निकाल अवलंबून असतील.

आम आदमी पक्षाने सर्व १३ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. अकाली दलातील बंडखोर नेत्यांचा अकाली दल (टाकसाली) आणि ‘आप’ला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्यांची पंजाबी एकता पार्टीही रिंगणात आहे. टाकसालींच्या दलाने बसपा, आपतर्फे निवडून आलेले व आपमध्ये सध्या नसलेल्या खा. डॉ. धरमवीर गांधींच्या गटाशी आघाडी केली आहे. पंजाबी एकता पार्टीलाही या आघाडीत असेल. पंजाब डेमॉक्रेटि अलायन्स असे तिचे नाव आहे.

पंजाबने २००९ मध्ये काँग्रेसला कौल दिला. तेव्हा काँग्रेसला आठ, अकाली दलाला चार, तर भाजपाला एक जागा मिळाली. पण २०१४ साली चित्र पालटले. अकाली दलाला चार, भाजपाला दोन, तर काँग्रेसला तीन जागांवर विजय मिळवता आला. या निवडणुकीत पहिल्यांदाच पंजाबच्या राजकारणात आपने प्रवेश करून चार जागा मिळवत प्रस्थापित पक्षांसमोर आव्हान उभे केले.

पुढे २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत आप राज्यात बस्तान बसवेल, असे वाटत होते. मात्र, विधानसभेला जनमताचा लंबक काँग्रेसच्या बाजूने झुकला. काँग्रेसने ११७ पैकी ७७ जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली आणि दहा वर्षांनंतर राज्यात काँग्रेस सत्तेवर आली. कॅप्टन अमरिंदर सिंग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. भाजपा-अकाली दलाच्या प्रकाशसिंग बादल सरकारचे राज्य खालसा झाले.
पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही काँग्रेसने मोठा विजय मिळवला. जिल्हा परिषदेच्या ३५३ पैकी ३३१ जागा जिंकल्या. अकाली दलाला १८ व भाजपाला दोनच जागा मिळाल्या. आपला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे काँग्रेसची स्थिती मजबूत आहे.

लोकसभा निवडणुकीत अकाली दल, भाजपा एकत्र लढतील. भाजपा येथे अकाली दलाच्या लहान भावाच्या भूमिकेत आहे. सध्या अकाली दलाला फुटीचे ग्रहण लागले आहे. खासदार रणजीतसिंग ब्रह्मपुरा, माजी मंत्री रतन सिंग अजनाला, माजी मंत्री सेवासिंग सेखवा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी प्रकाशसिंग बादल व माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल या पिता-पुत्रांविरोधात मोर्चा उघडून, शिरोमणी अकाली दल (टकसाली) या पक्षाची स्थापना केली. त्याचवेळी काँग्रेसचे माजी आमदार जोगिंदरसिंग पंजगराई हे समर्थकांसह अकाली दलात सामील झाले आहेत.

‘आप’मध्ये ना‘राजीनामा’ नाट्य रंगले आहे. आमदार एच. एस. फुलका यांनी राजीनामा दिला आहे. बंडखोर आमदार सुखपाल सिंग खैरा यांनी पंजाबी एकता पार्टी स्थापन केली आहे. आमदार मास्टर बलदेव सिंग यांनीही खैरा यांच्याशी हातमिळवणी केली आहे, तर टाकसालीने बसपा, डॉ. धरमवीर गांधी यांच्या गटासोबत आघाडी केली आहे. मतांच्या विभाजनासाठी हे राजकीय उद्योग सुरू असल्याने त्याचा फायदा काँग्रेस उठवण्याची शक्यता आहे.

मते वळवण्याचे आव्हान

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस चांगल्या स्थितीत आहे. पण अकाली दलाला बंडखोर नेते रणजित सिंग ब्रह्मपुरा, निलंबित केलेले शेरसिंग घुबाया यांना सशक्त पर्याय शोधावा लागेल. घुबाया यांचा शीख समाजावर मोठा प्रभाव आहे. हा प्रभाव तसेच अकाली दल (टाकसाली) या नव्या पक्षामुळे विभागली जाणारी मते आपल्याकडे वळवणे हेच अकाली दलापुढे आव्हान आहे.

असे आहेत
प्रचाराचे प्रमुख मुद्दे

धार्मिक ग्रंथ अवमान प्रकरण, पाणी प्रश्न, अमली पदार्थांचे वाढते जाळे, विकास, शेतकºयांचे प्रश्न, शिक्षण, रोजगार इत्यादी.

Web Title: The power of Punjab in many phases will be considered by many parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.