यूपीमध्ये शक्तिप्रदर्शन
By Admin | Published: January 30, 2017 01:02 AM2017-01-30T01:02:38+5:302017-01-30T01:02:38+5:30
उत्तरप्रदेशच्या राजधानीत काँग्रेस आणि सपाच्या रोड शोने रविवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव या रोड शोमध्ये सहभागी झाले होते.
लखनौ : उत्तरप्रदेशच्या राजधानीत काँग्रेस आणि सपाच्या रोड शोने रविवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव या रोड शोमध्ये सहभागी झाले होते. जुन्या लखनौ शहरात या रोड शोचे एका सभेत रुपांतर झाले. यावेळी या नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. भाजप आणि बसपला सत्तेपासून रोखणे आणि विकासाचे राजकारण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. मोदी हे निवडक श्रीमंत घराण्यांसाठी काम करत आहेत. विजय माल्ल्या आणि ललित मोदी यांचा उल्लेख करुन ते म्हणाले की, मोदी सरकारने श्रीमंतांचा काळा पैसा नोटाबंदीच्या माध्यमातून पांढरा केला आहे. तर, गरीबांचे कंबरडे मोडले आहे. ऐतिहासिक घंटाघर येथे गर्दीने खचाखच भरलेल्या परिसरात हे दोन नेते व्यासपीठापर्यंत गर्दीमुळे जाऊ शकले नाहीत. ज्या वाहनावरुन ते रोड शो करत होते त्याच वाहनावरुन त्यांनी जनतेला संबोधित केले.
काँग्रेस-सपा आघाडी म्हणजे गंगा-यमुनेचा संगम
काँग्रेस आणि सपाची आघाडीम्हणजे गंगा यमुनेचा संगम आहे. यातून विकासाची सरस्वती वाहू लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांची नियत चांगली नाही.
सपासोबत एकत्र येऊन आपण भाजपच्या व्देष आणि फुटीरवादी राजकारणाशी दोन हात करु, असे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
येथे संयुक्त पत्रकारपरिषदेत बोलताना ते म्हणाले की, या आघाडीमुळे अखिलेश यादव यांच्याशी आपले वैयक्तिक आणि राजकीय संबंध दृढ झाले आहेत. दरम्यान, काँग्रेससोबत आपण ३०० जागा जिंकू असा दावा करताना अखिलेश यादव म्हणाले की, सायकलसोबत जर हात असेल तर विचार करा की त्याची गती काय असेल.
राहुल गांधी म्हणाले की, आम्ही पीपीपी म्हणजेच प्रोग्रेस, प्रॉस्पेरिटी आणि पीस यासाठी काम करणार आहोत.
अमेठी आणि रायबरेली येथील जागांबाबत राहुल गांधी यांना प्रश्न केला असता ते म्हणाले की, हा
केंद्रीय मुद्दा नाही. तर, मुद्दा हा आहे की, आम्हाला उत्तरप्रदेश राज्य बदलायचे आहे.
दरम्यान, प्रियंका गांधी या निवडणूक प्रचार करणार का? यावर राहुल गांधी म्हणाले की, याबाबत प्रियंका गांधी याच निर्णय घेतील. राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेऊन देशातील बहुतांश लोकांना मोठा त्रास दिला आहे. तर निवडक श्रीमंतांचे खिसे भरले गेले आहेत.
तर अखिलेश यादव म्हणाले की, शेतकरी, गरीब आणि तरुणांसाठी यापुढेही आपण काम करत राहू.