अरुणाचल प्रदेशात होणार तीन दिवसांत शक्तिपरीक्षण

By admin | Published: July 14, 2016 10:43 PM2016-07-14T22:43:03+5:302016-07-14T22:43:03+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बुधवारी पुन्हा सत्तेवर आलेल्या अरुणाचल प्रदेशातील काँग्रेसच्या नाबाम तुकी सरकारला राज्यपालांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी फक्त

Power test in Arunachal Pradesh for three days | अरुणाचल प्रदेशात होणार तीन दिवसांत शक्तिपरीक्षण

अरुणाचल प्रदेशात होणार तीन दिवसांत शक्तिपरीक्षण

Next

राज्यपालांचा आदेश: मुख्यमंत्री तुकी यांच्यापुढे आव्हान

इटानगर: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बुधवारी पुन्हा सत्तेवर आलेल्या अरुणाचल प्रदेशातील काँग्रेसच्या नाबाम तुकी सरकारला राज्यपालांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी फक्त तीन दिवसांची मुदत दिल्याने नव्या राजकीय खडाजंगीची चिन्हे दिसत आहेत.
तुकी सरकारने राज्य विधानसभेचे अधिवेशन लवकरात लवकर बोलावून आपले बहुमत १६ जुलैपर्यंत सिद्ध करावे. विधिमंडळाच्या या कामकाजाचे पूर्णपणे व्हिडियो रेकॉर्डिंग केले जावे आणि विश्वासदर्शक ठरावावरील मतदान आवाजी मतदानाने नव्हे तर हात उंचावून घेतले जावे, असे निर्देश राज्यपाल ज्योती प्रसाद राजखोवा यांनी गुरुवारी दिले. याआधीही राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन ठरल्या तारखेहून एक महिना आधी बोलावणे व सभागृहात कामकाज कसे करावे याचे दिलेले निर्देश घटनाबाह्य ठरवून सर्वोच्च न्यायालयाने तुकी सरकारच्या पुनर्स्थापनेचे आदेश दिले होते.
न्यायालयाच्या निकालानंतर तुकी यांनी बुधवारी सायंकाळी नवी दिल्लीत अरुणाचल भवनमध्येच मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार पुन्हा औपचारिकपणे स्वीकारला होता. गुरुवारी इटानगरला परत आल्यावर त्यांना राज्यपालांचे निर्देश मिळाले. राज्यपाल राजखोवा रजेवर आहेत व त्यांचा अतिरिक्त कार्यभार आसामचे राज्यपाल तथागत रॉय यांच्याकडे आहे.
तीन दिवसांची मुदत अगदीच अपुरी आहे. एवढया कमी वेळेत विधानसभेचे अधिवेशन भरवून शक्तिप्रदर्शन करून घेणे अशक्य आहे. त्यामुळे ही मुदत वाढवून देण्याची विनंती आपण कार्यवाहक राज्यपालांना करू, असे मुख्यमंत्री तुकी यांनी सांगितले.
आधीच्या राजकीय नाटयात केंद्रस्थानी राहिलेले विधानसभेचे अध्यक्ष नाबाम रेबिया यांनीही मुख्यमंत्र्यांचे समर्थन केले. ते म्हणाले की, शक्तिपरीक्षणासंबंधीचे राज्यपालांचे निर्देश मला मिळाले आहेत. परंतु राज्याची डोंगराळ व दुर्गम अशी भौगोलिक रचना, सध्याचे वाईट हवामान व संपर्क साधण्यातील अडचणी यामुळे सर्व आमदारांना एवढ्या कमी वेळेत निरोप पोहोचवून विधानसभेचे अधिवेशन भरविणे शक्य होणार नाही.
मात्र राज्याच्या विकासासाठी सर्व काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्री तुकी यांचे हात बळकट करावेत, असे आवाहन करून रेबिया यांनी विधानसभा अध्यक्ष या नात्याने राजकीय नि:पक्षतेचे संकेत पाळले नाहीत.
काँग्रेसचे १४ आमदार फोडून त्यांच्या मदतीने कालिको पूल यांनी स्थापन केलेले सरकार न्यायालयाच्या निकालामुळे पायउतार झाले. परंतु या फुटीर आमदारांना पुन्हा काँग्रेसच्या कळपात आणल्याखेरीज तुकी यांनी बहुमत सिद्ध करणे शक्य नाही. हे इतके सोपे नाही. कारण आधी काँग्रेसनेच विधानसभा अध्यक्षांकडे अर्ज करून त्यांना अपात्र घोषित करून घेतले होते. गुवाहाटी उच्च न्यायालयाने या अपात्रतेस अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे आजही औपचारिकपणे हे १४ आमदार पुल यांच्याच गटात आहेत.
(वृत्तसंस्था)

 

Web Title: Power test in Arunachal Pradesh for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.