पाकिस्तानात मशिदीवर आत्मघातकी हल्ला; भारताविरोधी वक्तव्य करणाऱ्या मौलानाच्या मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:05 IST2025-02-28T17:00:40+5:302025-02-28T17:05:01+5:30
पाकिस्तानात रमजान सुरु होण्यापूर्वीच भीषण स्फोट झाला असून यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला.

पाकिस्तानात मशिदीवर आत्मघातकी हल्ला; भारताविरोधी वक्तव्य करणाऱ्या मौलानाच्या मुलाचा मृत्यू
Pakistan Blast:पाकिस्तान पुन्हा एकदा स्फोटाने हादरला आहे. पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात असलेल्या मशिदीमध्ये शुक्रवारी जोरदार स्फोट झाला. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात असलेल्या मशिदीमध्ये झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात पाच लोक ठार झाले असून अनेक लोक जखमी झालेत. सुसाईड बॉम्बरने शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी मशिदीच्या मुख्य हॉलमध्ये स्फोट घडवून आणला. हल्लेखोराने नमाज संपताच स्वत:ला उडवले. या हल्ल्यात पाकिस्तानातील फादर ऑफ तालिबान मौलाना समी-उल हक यांचा मुलगा मौलाना हमीद उल हक हक्कानी याचाही या हल्ल्यात मृत्यू झाला.
पवित्र रमजान महिना सुरू होण्यापूर्वीच खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अकोरा खातख जिल्ह्यात हा स्फोट झाला. ही मशीद तालिबान समर्थक जामिया हक्कानियाच्या अंतर्गत होती. स्फोटानंतर पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जामिया हक्कनिया मदरशात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.
या आत्मघातकी हल्ल्यातमौलाना हमीद उल हक हक्कानी ठार झाला. हमीद उल हक हक्कानी हा पाकिस्तानातील हक्कानिया मदरशाचा प्रमुख होता. हक्कानी हा त्याच्या भारतविरोधी वक्तव्यामुळे चर्चेत होते. हक्कानी हा पाकिस्तानी तालिबानचा जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौलाना समी-उल-हक यांचा मुलगा होता. हक्कानीच्या वडिलांचीही त्यांच्या घरात हत्या झाली होती.
ज्या मदरशामध्ये हा स्फोट झाला त्या मदरशामध्ये सुमारे ४,००० विद्यार्थी राहतात. त्यांना मोफत अन्न, कपडे आणि शिक्षण दिले जाते. पाकिस्तानी मदरसे अनेक दशकांपासून अतिरेक्यांना जन्म देणारे ठिकाण म्हणून काम करत आहेत. तिथे हजारो निर्वासितांना शिक्षण दिले जाते.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत किमान पाच लोकांचा मृत्यू झाला आहे, तर डझनहून अधिक लोक जखमी झाले आहेत. स्फोट झाला तेव्हा मशिदीच्या आत मोठ्या संख्येने लोक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मौलाना हमीद उल हक हक्कानी यांच्या सुरक्षेसाठी १० ते १५ जण तैनात करण्यात आले होते. या बॉम्बस्फोटात हे लोक जखमीही झाले.
दरम्यान, तालिबान या दहशतवादी संघटनेचा जनक म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानी धर्मगुरू मौलाना समी-उल-हक याचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. रावळपिंडीच्या गॅरिसन टाऊनमध्ये त्याची हत्या झाली. मौलाना समी-उल-हक यांच्या विचारांचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या तालिबानमध्ये मोठा प्रभाव होता.