Pradeep Mehra Running Noida Viral Video: रनिंग बॉय प्रदीप मेहरानं घेतली नोएडा डीएम यांची भेट; आईच्या उपचारासह अन्य समस्या दूर करण्याचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 08:25 AM2022-03-23T08:25:10+5:302022-03-23T08:27:12+5:30
सोशल मीडियावर (Social Media) सध्या प्रदीप मेहरा या युवकाचा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) होत असून व्हिडीओमधील तरुणाने सर्वाचंच मन जिंकलं आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये १९ वर्षांचा मुलगा रात्री उशिरा धावताना दिसत आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या मुलाचे नाव प्रदीप मेहरा (Pradeep Mehra) असं आहे. तसंच तो मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे. आर्थिक संकटामुळे प्रदीप नोएडा येथील मॅकडोनाल्डमध्ये काम करतो. त्याची इच्छा सैन्यात भरती होण्याची आहे.
प्रदीपने मंगळवारी गौतम बुद्ध नगरचे जिल्हाधिकारी सुहास एल यथीराज यांची भेट घेतली. यावेळी त्यानं जिल्हाधिकाऱ्यांना त्याच्या आर्थिक परिस्थिती आणि भविष्याबद्दल सांगितलं. नवभारत टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. प्रदीप बारावी उत्तीर्ण आहे. मात्र, त्यांनी अद्याप पदवीसाठी प्रवेश घेतलेला नाही. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचं पुढील शिक्षण आणि करिअर कौन्सिलिंग करण्याविषयी सांगितलं. तसंच त्यांच्याकडून आईच्या उपचाराबाबत अहवाल मागवला आहे. जेणेकरून त्यांच्यावर जिल्ह्यात उपचार करता येतील.
"मी आज नोएडाच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी माझ्या आईच्या उपचारासाठी मदत करणार असल्याचं सांगितलं. सोबत लष्करात भरती होण्यासाठी चांगलं प्रशिक्षण घेण्यातही ते मदत करणार आहेत. सध्या मी माझं काम सुरू ठेवावं असंही त्यांनी सांगितलं," असं प्रदीपनं त्यांच्या भेटीनंतर सांगितलं.
काय आहे व्हायरल व्हिडीओत?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा रात्री उशिरा घराकडे धावत जात असल्याचं दिसत आहे. याच दरम्यान, विनोद कापरी हे त्याला आपल्या गाडीतून घरी सोडण्यीच ऑफर देतात. परंतु ते तो नाकारतो. त्यानंतर तो आपण मॅकडोनाल्डमध्ये काम करत असून शिफ्ट संपल्यानंतर घरी जात असल्याचंही सांगतो. आपलं नाव प्रदीप असल्याचं सांगतो उत्तराखंडच्या अल्मोडा येथील रहिवासी असल्याचंही त्यानं सांगितलं. तसंच आपण लष्करात जाण्यासाठी तयारी करत असून धावण्याचा सराव करण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे सवय होण्यासाठी शिफ्ट संपवून घरी जाताना धावत घरी जात असल्याचंही तो सांगताना दिसत आहे.
This is PURE GOLD❤️❤️
— Vinod Kapri (@vinodkapri) March 20, 2022
नोएडा की सड़क पर कल रात 12 बजे मुझे ये लड़का कंधे पर बैग टांगें बहुत तेज़ दौड़ता नज़र आया
मैंने सोचा
किसी परेशानी में होगा , लिफ़्ट देनी चाहिए
बार बार लिफ़्ट का ऑफ़र किया पर इसने मना कर दिया
वजह सुनेंगे तो आपको इस बच्चे से प्यार हो जाएगा ❤️😊 pic.twitter.com/kjBcLS5CQu
सतीष दुआ यांचा मदतीचा हात
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रि. लेफ्ट. जनरल सतीश दुआ यांनीदेखील प्रदीपसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी ट्वीट करत त्याची प्रशंसा केली आणि त्याच्या योग्यतेच्या आधारावर भरती परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी मदत करण्यास कुमाऊं रेजिमेंटचे कर्नल, माजी लष्कर कमांडर जनरल राणा कलिता यांच्यासोबत चर्चा केली आहे. आपल्या रेजिमेंटमध्ये भरती करण्यासाठी त्याला प्रशिक्षित करण्यासाठी प्रत्येक शक्य ते प्रयत्न करु असं आश्वासन दिल्याचंही त्यांनी दिल्याचं सांगितलं.