PM मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट; 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी जमा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 04:07 PM2023-07-27T16:07:07+5:302023-07-27T16:07:32+5:30
पीएम मोदींनी पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. तसेच, युरियाची नवीन जात 'युरिया गोल्ड' चे लॉन्चिंग केले.
Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) चा 14 वा हप्ता आज वितरित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राजस्थानमधील सीकर येथील एका कार्यक्रमात हा हप्ता जारी केला. सुमारे 18,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. यामुळे 8.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांना 2 लाख 60 हजार कोटींचा फायदा
शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 2000 रुपये ट्रान्स्फर सुरू झाले आहेत. या प्रसंगी पंतप्रधान म्हणाले, 'वीरांची भूमी असलेल्या शेखावतीतून देशासाठी अनेक विकास प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. आज पीएम-किसान सन्मान निधी अंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकर्यांना सुमारे 18 हजार कोटी रुपये पाठवले गेले आहेत. पीएम-किसानचा आजचा 14वा हप्ता जोडला तर आतापर्यंत 2 लाख 60 हजार कोटींहून अधिक रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले गेले आहेत. या पैशामुळे शेतकऱ्यांना विविध छोटे-मोठे खर्च भागवण्यात मोठी मदत झाली आहे.'
1.25 लाख पीएम किसान समृद्धी केंद्र
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, '1.25 लाख पीएम किसान समृद्धी केंद्रे देशाला समर्पित करण्यात आली आहेत. आज देशातील शेतकऱ्यांसाठी 1.5 हजारांहून अधिक एपीओसाठी डिजिटल कॉमर्ससाठी ओपन नेटवर्कचेही उद्घाटन करण्यात आले आहे.
आजच देशातील शेतकऱ्यांसाठी नवीन युरिया गोल्डही लाँच करण्यात आले आहे.' पीएम मोदींनी सीकरच्या कार्यक्रमात युरिया गोल्ड लॉन्च केले. युरियाची ही एक नवीन जात आहे, ज्यावर सल्फरचा लेप असेल. सल्फर लेपित युरियाचा परिणाम जमिनीतील सल्फरच्या कमतरतेची समस्या दूर करेल. त्यामुळे खतांचा वापर कमी होतो आणि पिकाची गुणवत्ता वाढते.