विवाहित पती-पत्नींना मोदी सरकार देणार ५१ हजार रुपये, करावं लागेल केवळ हे काम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 11:18 AM2022-11-23T11:18:02+5:302022-11-23T11:21:31+5:30
Pradhan Mantri Vaya Vandana Yojana : या योजनेत तुमची गुंतवणूक ही १० वर्षांसाठी असते. १० वर्षांपर्यंत तुम्हाला वार्षिक किंवा मासिक पेन्शन दिली जाते. जर तुम्ही १० वर्षे या योजनेत कायम राहिलात तर तुम्हाला तुमची गुंतवणूक परत केली जाते. तसेच तुम्ही ही योजना कधीही सरेंडर करू शकता.
नवी दिल्ली - केंद्र सरकारने पंतप्रधान वय वंदना योजना सुरू केली आहे. या योजनेमधून लाभार्थ्यांना पेन्शनची हमी देत आहेत. ही योजना केंद्र सरकारने २६ मे २०२० रोजी सुरू केली होती. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्ज करू शकता. पती पत्नी दोघेही ६० वर्षे झाल्यानंतर या योजनेतून पेन्शन घेऊ शकतात.
पंतप्रधान वय वंदना योजना ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. त्याअंतर्गत अर्जदाराला वार्षिक, त्रैमासिक किंवा मासिक पेन्शन देण्याची तरतूद आहे. ही योजना भारत सरकारने आणली आहे. ही योजना एलआयसीकडून चालवली जाते. ज्या व्यक्तींचं वय ६० किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशाच व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेत कमाल १५ लाख रुपये गुंतवता येतात. आधी या योजनेत केवळ ७.५ लाख रुपये गुंतवता येत होते. मात्र आता ही रक्कम दुप्पट करण्यात आली आहे. या योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज मिळते.
जर पती आणि पत्नी दोघेही या योजनेचा लाभ मिळवू इच्छित असतील तर त्यांना प्रधानमंत्री वय वंदना योजनेमध्ये सुमारे प्रत्येकी ३ लाख ७ हजार ५०० रुपये गुंतवावे लागतील. म्हणजेच एकूण ६ लाख १५ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या योजनेवर एकूण ७.४० टक्के व्याज दिले जाते. त्या हिशेबाने वर्षाची पेन्शन ही ५१ हजार ४५ रुपये एवढी होते. जर तुम्हाला दरमहा पेन्शन हवी असेल तर ४१०० रुपये पेन्शनच्या रूपात मिळेल.
या योजनेत तुमची गुंतवणूक ही १० वर्षांसाठी असते. १० वर्षांपर्यंत तुम्हाला वार्षिक किंवा मासिक पेन्शन दिली जाते. जर तुम्ही १० वर्षे या योजनेत कायम राहिलात तर तुम्हाला तुमची गुंतवणूक परत केली जाते. तसेच तुम्ही ही योजना कधीही सरेंडर करू शकता.