राजीव गांधींच्या हत्येवेळी जखमी झालेले प्रदीप व्ही. फिलीपांची 'ती' इच्छा कोर्टानं केली पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 05:45 AM2021-10-03T05:45:57+5:302021-10-03T05:47:09+5:30
तपास अधिकाऱ्यांनी रक्त लागलेल्या या सर्व वस्तू घटनास्थळावरून जप्त केल्या. न्यायालयात याला निशाणी क्रमांक देण्यात आला
डॉ. खुशालचंद बाहेती
चेन्नई : राजीव गांधी हत्येच्या वेळी जखमी झालेल्या अधिकाऱ्याची रक्ताने माखलेली टोपी व गणवेशावरील नावाची पट्टी निवृत्तीच्या दिवशी परिधान करण्याची इच्छा न्यायालयाने पूर्ण केली. प्रदीप व्ही. फिलीप हे २१ मे १९९१ रोजी राजीव गांधी यांच्या श्रीपेरूंबुदूर येथील सभेच्या बंदोबस्तात होते. त्यावेळी ते अप्पर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते. मानवी बाॅम्ब फुटला तेव्हा ते राजीव गांधीच्या जवळच होते, पण यातून ते आश्चर्यकारक रीत्या बचावले. त्यांची टोपी, नावाची पाटी व गणवेशाचा सरंजाम फेकला गेला व ते स्वत: गंभीर जखमी झाले.
तपास अधिकाऱ्यांनी रक्त लागलेल्या या सर्व वस्तू घटनास्थळावरून जप्त केल्या. न्यायालयात याला निशाणी क्रमांक देण्यात आला. सेवानिवृत्तीच्या महिनाभर अगोदर त्यांनी न्यायालयात या वस्तू मिळण्यासाठी अर्ज केला. या वस्तूंशी त्यांच्या भावना जुळलेल्या असून ते हे सर्व निवृत्तीच्या दिवशी परिधान करू इच्छितात, असे न्यायालयास सांगितले. तपास यंत्रणांनीही तात्पुरत्या स्वरूपात या वस्तू देण्यास हरकत नसल्याचे सांगितले. न्यायालयाने त्यांच्या भावनांची दखल घेतली आणि त्यांचा गौरवपुर्वक उल्लेख करत विनंती मान्य केली. निवृत्तीनंतर न्यायालयाचा मुद्देमाल परत करण्याच्या अटीवर टोपी, नाम पट्टी व सरंजाम तात्पुरता प्रदीप व्ही. फिलीप यांना दिला.
प्रदीप व्ही. फिलीप भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी ३० सप्टेंबर रोजी अप्पर पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त झाले. त्यांना २००३ मध्ये राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण व २०१२ मध्ये विशेष सेवा पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.
या टोपी व सरंजामात अधिकाऱ्यांच्या ३४ वर्षे सेवेत घेतलेल्या परिश्रमाच्या भावना दडलेल्या आहेत. त्यांनी सेवेत गाळलेला घाम व रक्ताचे ते प्रतीक आहे. न्यायालय त्यांनी जबाबदार अधिकारी म्हणून बजावलेल्या गौरवपूर्ण आणि निर्दोष सेवेला सलाम करते. निवृत्तीनंतर त्यांना शांततेचे दिर्घायुष्य लाभो. त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडत राहो, या शुभेच्छा. - टी. चंद्रशेखरन, प्रथम सत्र न्यायाधीश, चेन्नई