प्रद्युम्न हत्या प्रकरण- 'पोलिसांनी मला जबरदस्तीने गुन्हा कबुल करायला लावला, वकील देणार असल्याचंही आश्वासन दिलं'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 09:31 AM2017-11-24T09:31:10+5:302017-11-24T09:32:58+5:30
प्रद्युम्न हत्या प्रकरणात दररोज धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.
गुरूग्राम- प्रद्युम्न हत्या प्रकरणात दररोज धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. प्रद्युम्नची हत्या झाल्यानंतर स्कूल बसच्या कंडक्टरला हत्येचा आरोपात अटक झाली पण कंडक्टर विरोधात कुठलेही सबळ पुरावे नसल्याने त्याला मंगळवारी जामीन मंजूर करण्यात आला. बुधवारी कंडक्टर अशोक कुमार भोंडसी कारागृहातून बाहेर आल्यापासून त्याची प्रकृती ठीक नसल्याचं समोर आलं आहे. बोलताना अशोक कुमारचा श्वास अडकतो आहे. अशोकला गेल्या दहा दिवसांपासून ताप येत असून बुधवारी घरी आल्यापासून त्याने व्यवस्थित काही खाललंसुद्धा नसल्याचं अशोकची पत्नी ममताने सांगितलं आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
8 सप्टेंबर रोजी प्रद्युम्नची हत्या झाल्यानंतर कंडक्टर अशोक कुमारला लगेचच अटक करण्यात आली. अशोकने गुन्ह्याची कबुली दिल्यावर मीडियामध्ये याबद्दलची माहिती देण्यात आली होती. याविषयी अशोकने धक्कादायक खुलासा केला आहे. 'प्रद्युम्नची हत्या झाल्यानंतर पाच-सहा पोलीस मला सोहना गुन्हे शाखेत घेऊन गेले. त्यांनी मला दोन इंजेक्शन्स दिली तसंच इलेक्ट्रिक शॉक दिेले तसंच अत्यंत निर्दयीपणे मारहाण केली. इतकंच नाही, तर त्यांनी मला जबरदस्तीने गुन्हा कबूल करायला लावला. तसंच या प्रकरणातून सुटण्यासाठी वकील मिळवून देऊन केस लढायला मदत करू, असं आश्वासन पोलिसांनी दिलं, असं अशोक कुमारने सांगितलं आहे. त्यावेळी मी शुद्धीत नव्हतो. दुसऱ्या दिवशी मला जेव्हा मीडियासमोर सादर करण्यात आलं तेव्हा शुद्ध आल्याचंही अशोक कुमारने सांगितलं. त्या रात्री मला मारहाण करणाऱ्या पोलिसांना मी ओळखू शकलो नाही, असंही अशोक कुमारने म्हंटलं. भोंडसी तुरूंगात दोन महिने अशोक होता. अजून काही दिवस मला तिथे ठेवलं असतं तर मी मेलो असतो किंवा वेडा झालो असतो, असंही अशोकने म्हंटलं.
तुरूंगात असताना तेथिल अधिकारी सय्यद मोहम्मद माझ्यासाठी आशेचा स्त्रोत होते. मला जिथे ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणी प्रचंड काळोख होता. मला तेथून बाहेर जायची परवानगी नव्हती. तसंच कोणाशी बोलायला सक्त मनाई करण्यात आली. मोहम्मद सेलमध्ये माझ्यावर नजर ठेऊन होता. पण काही दिवसांनंतर त्यांनी माझी काळजी घ्यायला सुरूवात केली. मोहम्मद मला सहानुभूती दाखवत लवकरच तुरूंगातून बाहेर जाशील, असं सांगायचे, असं अशोक कुमारने सांगितलं.
यापुढे कधीही रायन स्कूलमध्ये किंवा इतर कुठल्याही ठिकाणी नोकरीसाठी जाणार नसल्याचं अशोकने म्हंटलं. माझं पुढील आयुष्य मी साधारण कामं करून जगणार आहे. शाळेतील कुठलीही व्यक्ती मला भेटायला आली नाही. ते भेटायला येतील अशी अपेक्षाही नव्हती, असं अशोक म्हणाला. सरकारने मला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अशोक कुमारने केली आहे.