प्रद्युम्न हत्या प्रकरण- 'वडिलांनी त्यांचा मुलगा गमावला पण माझ्या मुलाला वाचवलं'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 12:03 PM2017-11-11T12:03:04+5:302017-11-11T12:11:43+5:30
केला देवी यांच्याकडे प्रद्युम्नच्या वडिलांचे म्हणजेच बरूण ठाकूर यांचे आभार मानायला शब्द नाहीयेत.
गुरूग्राम- केला देवी यांच्याकडे प्रद्युम्नच्या वडिलांचे म्हणजेच बरूण ठाकूर यांचे आभार मानायला शब्द नाहीयेत. प्रद्युम्नचे वडिल प्रद्युम्नला न्याय मिळावा यासाठी देत असलेल्या लढ्यामुळे आज केला देवी यांना त्याच्या मुलाला तुरूंगातून बाहेर पडताना पाहता येणार आहे. प्रद्युम्नच्या हत्येनंतर पोलिसांच्या स्कूल बसचा कंडक्टर असलेल्या अशोक कुमारला अटक केली होती. पण नंतर प्रकरणाने कलाटणी घेत शाळेतील अकरावीच्या मुलाने प्रद्युम्नची हत्या केल्याची कबुली त्या विद्यार्थ्याने दिली. या सगळ्यामुळे अशोक कुमारच्या घरच्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
बरूण ठाकूर यांनी त्यांचा मुलगा (प्रद्युम्न) गमावला पण त्यांनी माझ्या मुलाचं आयुष्य वाचवलं. मी त्या कुटुंबाची नेहमीच ऋणी राहील, अशी भावना अशोक कुमार याची आई केला देवी यांनी व्यक्त केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी बरूण ठाकूर यांचे आभार मानले. प्रद्युम्नच्या हत्येनंतर कंडक्टर अशोक कुमारला अटक झाली होती. पण प्रद्युम्नच्या वडिलांनी पोलीस तपासावर संशय व्यक्त केला होता. तसंच हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी द्यावं, यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर प्रद्युम्न हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू झाली.
अशोक कुमारला पोलिसांनी प्रद्युम्नच्या हत्येच्या दिवशीच म्हणजे 8 सप्टेंबर रोजी अटक केली होती. तेव्हापासूनच अशोक कुमारच्या घरचे अशोक निर्दोश असून त्याला यामध्ये अडकविण्यात आल्याचं पोलिसांना सांगत होते. या आठवड्याच्या सुरूवातील प्रद्युम्नचा खरा मारेकरी सीबीआय तपासात समोर आल्यावर अशोकच्या घरच्यांनी निश्वास सोडला. अशोकला अटक झाल्यावर प्रद्युम्नच्या वडिलांनीही त्या अटकेवर संशय व्यक्त केला होता.
अशोकने कुटुबीयांची काळजी घेण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. एक लहान घर बांधणं आणि मुलांना चांगलं शिक्षण देणं, हेच त्याचं स्वप्न आहे, असं केला देवी यांनी म्हंटलं. अशोक कुमारला दोन मुलं आहेत. एक मुलगा आठ वर्षाचा तर दुसरा पाच वर्षाचा आहे. आपले वडील लवकर घरी परत येतील, या आशेत अशोकची दोन मुलं त्यांची वाट बघतायेत. रोज संध्याकाळी पाच वाजता वडील कामावरून घरी येतात आणि मला बाजूच्या दुकानात चॉकलेट आणायला नेतात, असं अशोक कुमारच्या लहान मुलाने म्हंटलं आहे.