प्रद्युम्न हत्या: रायन इंटरनॅशनल स्कूलच्या मालकांना होणार अटक? समन्स जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 12:28 PM2017-09-22T12:28:31+5:302017-09-22T12:34:21+5:30
रायन इंटरनॅशनल स्कूल आणि प्रद्युम्न हत्या प्रकरणात गुरुग्राम पोलिसांनी समूह संस्थापक ऑगस्टाईन पिंटो आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात समन्स जारी केला आहे.
गुरूग्राम - रायन इंटरनॅशनल स्कूल आणि प्रद्युम्न हत्या प्रकरणात गुरुग्राम पोलिसांनी समूह संस्थापक ऑगस्टाईन पिंटो आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात समन्स जारी केला आहे. पोलिसांच्या चौकशीत पिंटो कुटुंबियांकडून सहकार्य केलं जात नसल्याची माहिती आहे. प्रद्युम्नच्या हत्या प्रकरणामुळे पोलीस पिंटो कुटुंबियांच्या ठिकाणांवर छापेमारी करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
यापूर्वी मुंबई उच्च न्यायालय आणि पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने पिंटो कुटुंबियांना अटकपूर्व जामीन नाकारला आहे. प्रद्युम्न प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आली आहे. मात्र अजूवपर्यांत सीबीआयने चौकशीला सुरूवात केलेली नाही.
गुरूग्रामच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये 8 सप्टेंबर रोजी दुसरीत शिकणाऱ्या प्रद्युम्नची निर्घूण हत्या झाली होती. शाळेच्या स्वच्छतागृहात रक्ताच्या थारोळ्यात प्रद्युम्नचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी शाळेच्या बसचा कंडक्टर अशोक याच्यासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांकडून झालेल्या तपासणीत आरोपी अशोक कुमार याने गुन्ह्याची कबूली दिली.
प्रद्युम्न हत्याकांड: सीसीटीव्हीतून झाला खुलासा, मृत्यूशी झुंजत होता प्रद्युम्न-
गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेल्या सात वर्षाच्या प्रद्युम्नच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी गुरूवारी रायन इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षकांची चौकशी केली आणि सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं.
सीसीटीव्ही नुसार, 8 सप्टेंबरच्या सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी बस कंडक्टर शाळेत पोहोचला होता. सर्वात आधी ड्रायव्हर अशोकने बस शाळेच्या आवारात उभी केली आणि त्यानंतर प्रद्युम्नला मारण्यासाठी तो शाळेच्या मेन गेटमधून आतमध्ये गेला आणि थेट टॉयलेटमध्ये पोहोचला.
फुटेजमधून खुलासा झाल्यानुसार दोघं एका मागोमाग एक टॉयलेटमध्ये गेले होते.कोणताही तिसरा व्यक्ती शाळेच्या टॉयलेटमध्ये गेला नव्हता हे देखील सीसीटीव्हीमधून स्पष्ट झालं आहे. ही घटना सकाळी 7 वाजून 55 ते 8 वाजून 5 मिनिटांदरम्यान घडली.
सकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी प्रद्युम्न शाळेत येतो. त्याचे वडील वरूण ठाकूर त्याला आणि त्याच्या बहिणीला शाळेच्या मेन गेटवर सोडतात आणि निघून जातात. शाळेत गेल्यावर प्रद्युम्नची बहिण तिच्या वर्गात जाते तर प्रद्युम्न वर्गात जाण्याआधी शेजारच्या टॉयलेटमध्ये जातो. प्रद्युम्न टॉयलेटमध्ये जाण्याआधी अशोक त्याच टॉयलेटमध्ये गेलेला असतो. थोड्याचवेळात प्रद्युम्न हा देखील त्याच टॉयलेटमध्ये जातो. 8 वाजता प्रद्युम्न आणि अशोक एका मागोमाग एक टॉयलेटमध्ये दाखल होतात. 8 वाजून 10 मिनिटांनी अशोक टॉयलेटमधून बाहेर येताना दिसतो. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात प्रद्युम्न टॉयलेटमधून सरकत बाहेर येतो. त्याच्या तोंडातून कोणताही शब्द बाहेर पडत नाही. त्याचा एक हात स्वतःच्या मानेभोवती असतो आणि काही क्षणात तो कॉरीडोरमध्ये एका जागी थांबतो.
शाळेतला माळी सर्वप्रथम प्रद्युम्नला पाहतो आणि आरडाओरडा करतो. त्यानंतर आजूबाजूच्या वर्गातले शिक्षक वर्गाबाहेर येतात. प्रद्युम्नला पाहून काही जणांच्या तोंडातून किंकाळी निघते तर काही रडायला लागतात. याच गोंधळाचा फायदा घेऊन अशोक तेथे येतो आणि प्रद्युम्नला उचलतो. त्यानंतर एका शिक्षकाच्या गाडीतून प्रद्युम्नला रूग्णालयात नेलं जातं पण तेथे त्याला डॉक्टर मृत घोषीत करतात.