प्रफुल्ल पटेल पुन्हा ‘ईडी’ समोर हजर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 12:13 PM2019-06-11T12:13:13+5:302019-06-11T12:26:49+5:30
तलवारला २००८- ०९ या कालावधीत २७२ कोटी रुपये मिळाले असा दावा ईडीने कोर्टात केला होता. दीपक तलवार हा प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र होता असे देखील कोर्टाने म्हटले होते.
नवी दिल्ली - यूपीए सरकारच्या कार्यकाळात झालेल्या हवाई वाहतूक उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी पुन्हा अंमलबजावणी संचालनालय कार्यालयात (ईडी) हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे सोमवारी पटेल यांची ईडीकडून आठ तास चौकशी करण्यात आली होती.
दीपक तलवार प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांना ६ जूनला हजर राहण्यासाठी ईडीने समन्स बजावले होते. मात्र त्यावेळी ते हजर राहिले नाहीत. त्यांनतर ईडीने पटेल यांना १० किंवा ११ जून रोजी हजर राहण्यासंबंधी समन्स बजावले होते. त्याप्रमाणे पटेल सोमवारी ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यांनतर तब्बल आठ तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांनतर त्यांचा जवाब नोंदण्यात आला. मात्र, मंगळवारी पुन्हा प्रफुल्ल पटेल हे ईडीच्या कार्यालयात हजर राहिले आहे.
Delhi: Former Civil Aviation Minister Praful Patel arrives at the Enforcement Directorate (ED) office for questioning by the agency, in connection with multi crore airline seat sharing scam. pic.twitter.com/gWvrLi8IHr
— ANI (@ANI) June 11, 2019
हवाई वाहतूक उद्योगातील करारातील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दीपक तलवार याला काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. दीपक तलवार हा सध्या तुरुंगात आहे. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारे काही हवाई मार्ग तलवारने तीन आंतरराष्ट्रीय विमानकंपन्यांना मिळवून दिले होते. या मोबदल्यात तलवारला २००८- ०९ या कालावधीत २७२ कोटी रुपये मिळाले असा दावा ईडीने कोर्टात केला होता. दीपक तलवार हा प्रफुल्ल पटेल यांचा चांगला मित्र होता असे देखील कोर्टाने म्हटले होते. त्यामुळे दीपक तलवारच्या अटकेनंतर प्रफुल्ल पटेल यांची देखील चौकशी ईडीने सुरु केली आहे.