बॉम्बस्फोट घडवला हे वदवून घेण्यासाठी तुरुंगात झाला छळ, प्रज्ञा सिंह यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 06:25 PM2019-04-18T18:25:52+5:302019-04-18T18:27:02+5:30
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यामधील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपाने भोपाळमधून उमेदवारी दिल्याने वादाला तोंड फुटले आहे
भोपाळ - मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यामधील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपानेभोपाळमधून उमेदवारी दिल्याने वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, प्रज्ञा सिंह यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत तुरुंगात असताना तुरुंग अधिकाऱ्यांकडून आपला छळ झाल्याचा आरोप केला. मुस्लिमांना मारण्यासाठी बॉम्बस्फोट घडवला. हे वदवून घेण्यासाठी रात्र रात्रभर मारहाण व्हायची असा आरोप प्रज्ञा सिंह यांनी केला.
तुरुंगात होत असलेल्या छळाबाबत माहिती देताना प्रज्ञा सिंह म्हणाल्या की, ''मी मुस्लिमांना मारण्यासाठी बॉम्बस्फोट केला आहे, असे वदवून घेण्यासाठी तुरुंगाधिकाऱ्यांकडून मारहाण होत असे. रात्र रात्र भर मारहाण होई. मारहाण करणारी माणसं बदलायची पण मारहाण सुरू राहायची. तसेच असा छळ होणारी मी एकटी नव्हते.''
दरम्यान, मालेगाव बॉम्ब स्फोटातील पीडिताच्या वडिलांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उमेदवारी मिळण्यापूर्वी तब्येतीचे कारण पुढे करत एनआयए कोर्टाकडून जामीन मिळवला आहे. त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. नासीर अहमद सय्यद बिलाल यांनी ही याचिका दाखल केली आहे.
भोपाळ मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार आलोक सांजर यांनी 7.14 लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पी.सी.शर्मा यांनी 3.43 लाख मतं मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून भोपाळ मतदार संघातून दिग्विजय सिंह यांनी मैदानात उतरविण्यात आले आहे. तर, भाजपाकडून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.