प्रज्ञा सिंह यांना मोठी जबाबदारी; शरद पवार, सुप्रिया सुळेंसोबत संरक्षण खात्याच्या समितीत स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 11:12 AM2019-11-21T11:12:09+5:302019-11-21T11:18:33+5:30
मध्य प्रदेशमधील भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीत स्थान देण्यात आले आहे.
नवी दिल्ली - मध्य प्रदेशमधील भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीत स्थान देण्यात आले आहे. या समितेचे नेतृत्त्व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे करत असून प्रज्ञा सिंह यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. शरद पवार, सुप्रिया सुळेंसोबत संरक्षण खात्याच्या समितीत ठाकूर यांना स्थान देण्यात आले आहे. वादग्रस्त वक्तव्य करुन प्रज्ञा सिंह नेहमीच चर्चेत असतात. संरक्षण मंत्रालयाच्या या समितीत एकूण 21 सदस्य आहेत.
संरक्षण खात्याच्या समितीत अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह फारुख अब्दुल्ला, ए. राजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मीनाक्षी लेखी, राकेश सिंह, भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा या नेत्यांचा समावेश आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर या नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करुन वाद निर्माण करत असतात. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधीबाबत ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपुत्र म्हटलं होतं.
पत्रकारांशी संवाद साधताना प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता न म्हणता त्यांचा उल्लेख राष्ट्रपुत्र असा केला होता. 'महात्मा गांधी हे राष्ट्रपुत्र आहेत आणि ते आमच्यासाठी आदरणीय आहेत' असे ठाकूर यांनी म्हटले. भोपाळ रेल्वे स्थानकात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या स्वच्छ भारत योजनेवर टीका केल्याने देखील प्रज्ञा सिंह अडचणीत आल्या होत्या. मध्य प्रदेशच्या सिहोरमध्ये एका जनसभेला संबोधित करताना ठाकूर यांनी मोदींच्या 'स्वच्छ भारत' योजनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. यावरुन पक्षाने ठाकूर यांना कठोर शब्दांमध्ये समज दिली. पक्षाच्या योजना आणि विचारधारा यांच्याविरोधात जाणारी विधाने करू नका, अशी सूचना नेतृत्त्वाकडून त्यांना करण्यात आली होती.
प्रज्ञा सिंह या 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकारातील आरोपी असून त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्ञा सिंह यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली होती. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे देशभक्त होता. मी त्यांना राष्ट्रवादी मानते, असे त्या म्हणाल्या होत्या. 26/11 हल्ल्यात शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे माझ्या शापाने मरण पावले, असे देखील त्या म्हणाल्या होत्या. या दोन्ही विधानांमुळे ठाकूर यांनी पक्षाला अडचणीत आणले होते.