ओमर-मेहबूबा यांच्यात प्रज्ञासिंहांच्या उमेदवारीने जोरदार कलगीतुरा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 04:51 AM2019-04-19T04:51:22+5:302019-04-19T04:51:55+5:30
‘पीडीपी’च्या मेहबूबा मुफ्ती व नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला या दोन नेत्यांमध्येच गुरुवारी आपसात ट्विटरवर कलगीतुरा रंगला.
श्रीनगर : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी दिल्याबद्दल भाजपवर टीका करण्याच्या नादात गुरुवारी ‘पीडीपी’च्या मेहबूबा मुफ्ती व नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला या दोन नेत्यांमध्येच गुरुवारी आपसात टि्वटरवर कलगीतुरा रंगला.
साध्वी प्रज्ञासिंह यांचा नामोल्लेख न करता मुफ्ती यांनी लिहिले की, दहशतवादाच्या खटल्यातील आरोपीला मी उमेदवारी दिली असती तर केवढी संतापाची लाट उसळली असती याची कल्पना करा. या महाभागांच्या (भाजप) लेखी सर्व मुस्लीम दहशतवादी असतात, पण भगव्या माथेफिरूंचा विषय आला की ते म्हणतात, दहशतवादाला धर्म नसतो, दोषी ठरेपर्यंत सर्वच निर्दोष असतात. वास्तविक या टिष्ट्वटमध्ये ओमर अब्दुल्लांचा दुरान्वयानेही संदर्भ नव्हता. पण त्यातील ‘हे महाभाग’चा रोख भाजपकडे आहे हे लक्षात घेऊन त्यांनी टिष्ट्वट करून मेहबूबा यांना टोला लगावला की या महाभागांनी तुम्हाला गचांडी देत सत्तेवरून दूर केले, तोपर्यंत तेच तुमचे मित्र होते. २०१४ मध्ये (दिल्लीत) सत्तेत येण्याआधीही हे महाभाग असेच होते, पण तुम्हाला त्यांची पापे जून २०१८नंतर दिसू लागली. खुर्चीच्या हव्यासाने तुम्हाला त्या वेळी काही दिसत नव्हते.
ओमर यांचा हा टोला निमूटपणे न घेता मेहबूबा यांनी प्रतिटोला लगावला की, त्यांचे जम्मू-काश्मीरमधील पहिले मित्र व त्यांच्या सरकारमधील एकेकाळचे केंद्रातील मंत्री या नात्याने त्यांचा खरा रंग तुम्हाला कळायला हवा होता. गुजरात दंगलींनंतर राम विलास पासवान यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला, पण तुम्ही मात्र नाही. ओमर, जरा बदाम खा, स्मरणशक्ती तल्लख होते! (वृत्तसंस्था)
>अॅन्टासिडची गोळी घ्या दोघांमधील हा कलगीतुरा
आणखीही काही टिष्ट्वटमधून पुढे सुरू राहिला. ओमर अब्दुल्लांनी मेहबूबा यांना यावर खुल्या चर्चेचे आव्हान दिले तर मेहबूबांनी पोटशूळ शमविण्यासाठी अॅन्टासिडची गोळी घेण्याचा सल्ला ओमर यांना दिला.