दिग्विजय सिंह यांना उत्तर देण्यासाठी प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी- पीयूष गोयल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 03:09 PM2019-05-08T15:09:23+5:302019-05-08T15:09:51+5:30
केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते पीयूष गोयल यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपा 74 जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते पीयूष गोयल यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपा 74 जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. जेवढे भ्रष्टाचारी आहेत, ते सर्वच तुरुंगात जातील. प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या उमेदवारीवर पीयूष गोयल म्हणाले, दिग्विजय सिंह यांनी ज्या प्रकारे हिंदू समाजाला अपमानित केलं, त्याचा आम्ही पर्दाफाश केला आहे. त्यासाठीच आम्ही प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली. आज दिग्विजय सिंह पंडित बोलावून पूजा करत आहेत. त्यांनीच कधी तरी हिंदू दहशतवाद हा शब्द प्रचलित केला होता.
काँग्रेस आधी सर्जिकल स्ट्राइक केलं हे मानण्यास तयार नव्हतं. आता ते सांगत आहेत की, आम्हीसुद्धा सर्जिकल स्ट्राइक केलं. खरं तर काँग्रेसनं सर्जिकल स्ट्राइक झाल्याचं मान्य केलं हे एका अर्थी बरं झालं. आम्ही राष्ट्रीय हितांच्या मुद्द्यावर सरकारला साथ दिली. काँग्रेसनं गेल्या 70 वर्षांत काहीही केलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 कोटी शौचालयं तयार केली. प्रत्येकानं जनधन खातं उघडलं. घरात वीज पोहोचली, उज्ज्वला योजनेचा लाभ लोकांना मिळाला. ममतादीदींनी जय श्री राम म्हणणाऱ्यांना तुरुंगात पाठवलं.
ममतांचं ध्रुवीकरणाचं राजकारण फार काळ चालणार नाही. आज देशभरात मोदींची त्सुनामी पाहायला मिळते आहे. शेतकरी, महिला आणि प्रत्येक क्षेत्रात विकास झाला आहे. प. बंगालमध्ये भाजपाला ऐतिहासिक विजय मिळेल. भाजपाच्या बाजूनं जनमत आहे. राजकीय हिंसेनं निवडणूक जिंकता येत नाहीत, असंही गोयल म्हणाले आहेत.