सीमेवर जवानांचे टेन्शन संपविणार ‘प्रहरी’, नोकरी आणि सेवा सुरक्षा संबंधित प्रत्येक अपडेट मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 08:30 AM2023-01-03T08:30:21+5:302023-01-03T08:30:50+5:30
पगार आणि भविष्य निर्वाह निधीची माहिती मिळवणे असो किंवा रजा आणि सरकारी निवास सुविधा मिळवणे असो, हे ॲप जवानांच्या सर्व गरजा पूर्ण करेल.
नवी दिल्ली : पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेवर २४ तास डोळ्यात तेल घालून बसलेल्या भारतीय जवानांचे टेन्शन आता संपणार आहे. या जवानांसाठी आता एक ॲप तयार करण्यात आले असून, त्याचे नाव प्रहरी आहे. पगार आणि भविष्य निर्वाह निधीची माहिती मिळवणे असो किंवा रजा आणि सरकारी निवास सुविधा मिळवणे असो, हे ॲप जवानांच्या सर्व गरजा पूर्ण करेल.
गृहमंत्री अमित शहा यांनी लाँच केलेल्या या ॲपमुळे प्रत्येक आवश्यक माहिती आणि सुविधा एकाच व्यासपीठावर उपलब्ध होतील, जेणेकरून जवान आणि अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढवता येईल.
काय मिळतील सुविधा?
सॅलरी स्लिप । जीपीएफ । घर । बायोडेटा । तक्रार निवारण । आयुष्मान-सीएपीएफ । कल्याणकारी योजनांसाठीच्या सूचना । सेवानिवृत्तीशी संबंधित लाभ
कसा करता येणार ॲपचा वापर?
गुगल प्ले स्टोअरवर जाऊन प्रहरी ॲप डाऊनलोड करावे लागेल. यानंतर रेजिमेंटल नंबर आणि जन्मतारीख टाकल्यानंतर नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर पासकोड सेट करावा लागेल.
मॅन्युअल बदल कार्यक्षमता वाढवेल?
सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) १३ नियमावलीत सुधारणा केली आहे. यामुळे अधिकारी आणि जवानांमध्ये ऑपरेशन, प्रशासन आणि प्रशिक्षणाची चांगली समज वाढेल आणि त्यांच्या कामाला गती मिळेल. मॅन्युअल अपडेट केल्याने बीएसएफचे सर्व स्तरावरील जवान आणि अधिकारी आरामात काम करू शकतील.
ॲपमध्ये प्रत्येक समस्येवर उपाय
बीएसएफ जवानांच्या किरकोळ समस्याही या ॲपद्वारे सोडवल्या जातील. वास्तविक, हे ॲप गृह मंत्रालयाच्या पोर्टलशीही जोडलेले असेल. केंद्रिकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीद्वारे, जवानांच्या प्रत्येक तक्रारीचे निर्धारित वेळेत निराकरण केले जाईल. हे ॲप सक्रिय प्रशासनाचे मॉडेल म्हणून तयार केले गेले आहे. त्यानंतर जवानांना ॲपचा मोठ्या प्रमाणात वापर करता येणार आहे.