बिल गेट्स यांच्याकडून मोदी सरकारचं कौतुक, 'आयुष्यमान भारत' योजनेचं गुणगान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 03:13 PM2019-01-17T15:13:35+5:302019-01-17T15:14:30+5:30
बिल गेट्स यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन भारत सरकारचे कौतुक केले.
नवी दिल्ली - मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि गेट्स फाऊंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं आहे. केंद्र सरकारच्या 'आयुष्यमान भारत' योजनेच्या यशस्वीतेमुळे गेट्स यांनी ट्विटरवरुन पीएमओ आणि भारत सरकारचे अभिनंदन केले. केवळ 100 दिवसांत 6 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे वाचून आपल्याला आनंद झाल्याचे गेट्स यांनी म्हटलंय.
बिल गेट्स यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन भारत सरकारचे कौतुक केले. 'आयुष्यमान भारत' योजनेच्या पहिल्या 100 दिवसांच्या यशस्वीतेबद्दल भारत सरकारचे अभिनंदन. या योजनेचा फायदा लोकांकडून मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे, हे ऐकून आनंद झाला, असे ट्विट गेट्स यांनी केले आहे. दरम्यान, आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी 2 जानेवारी रोजी ट्विट करून, पहिल्या 100 दिवसांत आयुष्यमान भारत योजनेतून 6 लाख 85 हजार नागरिकांना लाभ मिळाल्याचं सांगितलं होतं. तसचे नागरिकांकडून या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे. बिल गिट्स यांनी आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांचे ते ट्विट रिट्विट करून भारत सरकारला शुभेच्छा देत अभिनंदन केलं.
मोदी सरकारने गतवर्षी 2018 मध्ये आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ केला होता. 25 सप्टेंबर रोजी दिन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी या योजनेला सुरुवात करण्यात आली होती. त्यानुसार, गरीब कुटुंबातील व्यक्तींन वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळणार आहे. सध्या, बुधवारपर्यंत देशातील 8.50 लाख नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
Congratulations to the Indian government on the first 100 days of @AyushmanNHA. It’s great to see how many people have been reached by the program so far. @PMOIndiahttps://t.co/AHHktUt95z
— Bill Gates (@BillGates) January 17, 2019