प्रज्वल रेवन्ना भारतात येणार, बंगळुरूसाठी फ्लाइट तिकीट बुक!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 02:22 PM2024-05-29T14:22:01+5:302024-05-29T14:23:15+5:30
एसआयटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल रेवन्ना ३१ मे रोजी बंगळुरूमध्ये पोहचतील आणि ते तपास यंत्रणांसमोर हजर होतील.
बंगळुरू : सध्या कर्नाटकात खासदार प्रज्वल रेवन्ना प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू आणि कर्नाटकातील हसन मतदारसंघातील जेडीएसचे निलंबित नेता प्रज्वल रेवन्ना भारतामध्ये परत येत आहे. ३० मे म्हणजे उद्या ते भारतामध्ये येणार आहेत. त्यांनी जर्मनीतील म्यूनिख ते बंगळुरू असे फ्लाइटचे तिकीट बुक केले आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
एसआयटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रज्वल रेवन्ना ३१ मे रोजी बंगळुरूमध्ये पोहचतील आणि ते तपास यंत्रणांसमोर हजर होतील. दरम्यान, प्रज्वल रेवन्ना बंगळुरूला पोहोचताच त्यांना अटक केली जाईल, असेही सांगण्यात येत आहे. त्यासाठी एसआयटी कॅम्पेगौड एअरपोर्टवर सतत लक्ष ठेवून आहे. प्रज्वल रेवन्ना यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक छळ केल्याचे आरोप केले आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रज्वल रेवन्ना परदेशात फरार झाले.
प्रज्वल रेवन्ना यांच्यावर आतापर्यंत लैंगिक छळाचे दोन गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता, ज्यामध्ये त्यांनी ३१ मे रोजी एसआयटीसमोर हजर राहून तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. सूत्रांनी सांगितले की, प्रज्वल रेवन्ना यांनी यापूर्वी दोनवेळा त्यांचे जर्मनीहून विमानाचे तिकीट रद्द केले आहे. दरम्यान, एसआयटीने मंगळवारी हसन शहरातील प्रज्वलच्या घराची झडती घेतली, जी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल - जी. परमेश्वर
प्रज्वल रेवन्ना भारतात येताच त्यांना अटक केली जाईल, असे मंगळवारी कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी म्हटले आहे. प्रज्वल रेवन्ना हे ३१ मे पर्यंत भारतात परतले नाहीत, तर त्यांना परदेशातून परत आणण्याची पुढील प्रक्रिया सुरू होईल. भारतात येताच त्यांना अटक केली जाईल. तसेच, आरोपी खासदाराच्या अटकेबाबत अंतिम निर्णय विशेष तपास पथकाने (एसआयटी) घ्यायचा आहे, असे जी. परमेश्वर म्हणाले. दरम्यान, २८ एप्रिल रोजी राज्य सरकारने प्रज्वल रेवन्ना यांच्या विरोधात तपासासाठी एसआयटी स्थापन केली होती.