प्रज्वल रेवण्णा परत येणार, एसआयटीपुढे उपस्थित होणार; व्हिडीओ शेअर करत स्वतः दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 11:41 AM2024-05-28T11:41:47+5:302024-05-28T11:43:54+5:30
कथित सेक्स स्कॅण्डल उघडकीस आल्यानंतर २७ एप्रिलला प्रज्वलने जर्मनीत पलायन केले होते
बंगळुरू: कर्नाटकातील कथित सेक्स स्कॅण्डल प्रकरणातील आरोपी व जेडीएसचा निलंबित खासदार प्रज्वल रेवण्णा याने ३१ मे रोजी विशेष तपास पथकापुढे (एसआयटी) उपस्थित राहणार असल्याची माहिती व्हिडीओच्या माध्यमातून दिली.
एका वृत्तवाहिनीने प्रसारित केलेल्या व्हिडीओमध्ये प्रज्वल म्हणाला, शुक्रवारी (३१ मे) सकाळी १० वाजता मी एसआयटीपुढे उपस्थित राहीन. माझ्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांना सविस्तर उत्तर देत या प्रकरणाच्या तपासात पूर्ण सहकार्य करेल. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. माझ्यावर लावलेल्या खोट्या आरोपातून माझी सुटका होईल, असा मला विश्वास आहे. दरम्यान, प्रज्वलच्या या व्हिडीओबाबत पक्षाच्या वतीने वा कुटुंबीयांकडून कोणताही दुजोरा देण्यात आला नाही.
कथित सेक्स स्कॅण्डल उघडकीस आल्यानंतर २७ एप्रिलला प्रज्वलने जर्मनीत पलायन केले होते.
काँग्रेस नेत्यांवर आरोप
- एसआयटीने मला नोटीस बजावल्यानंतर त्यावर उत्तर देण्यासाठी माझ्या वकीलांनी एक आठवड्याची मुदत मागितली होती. माझ्या उत्तराची वाट न पाहता दुसऱ्याच दिवशी कॉंग्रेस नेत्यांनी माझ्यावर आरोप करण्यास सुरुवात केली.
- माझी राजकीय कारकीर्द उद्ध्वस्थ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नुकतेच मी राजकारणात स्थिरस्थावर होत असताना, मला संपविण्याचा कट आखला गेला. या सर्व घडामोडी पाहता मी नैराश्यात गेलो, असे प्रज्वल याने व्हिडीओत म्हटले आहे.
प्रज्वलने कुटुंबीयांची मागितली माफी
प्रज्वलने या व्हिडीओमध्ये कुटुंबीय, आई-वडिल, आजोबा एच.डी.देवेगौडा, काका व माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्यासह राज्यातील नागरिक व पक्षातील कार्यकर्त्यांची माफी मागितली.