प्रज्वल रेवण्णाचा आमदार भाऊही लैंगिक शोषणाच्या आरोपात अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 08:39 AM2024-06-24T08:39:14+5:302024-06-24T08:39:32+5:30
जेडीएसला आणखी एक धक्का, कार्यकर्त्यावर अनैसर्गिक अत्याचार
अनुभा जैन
लोकमत न्यूज नेटवर्क हसन (कर्नाटक) : अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याचा भाऊ आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचा विधान परिषद सदस्य सूरज रेवण्णा याला रविवारी 'अनैसर्गिक गुन्ह्याच्या' आरोपाखाली अटक झाली, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. २७ वर्षीय कार्यकर्त्याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी शनिवारी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यावर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'आरोपांमागे षडयंत्र'
कर्नाटकचे माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांनी रविवारी त्यांचा मुलगा आणि आमदार सूरज रेवण्णा यांच्यावरील पक्षाच्या कार्यकर्त्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप षडयंत्र असून, त्यांचा देवावर आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. वेळ आल्यावर सर्व काही सांगेन, असेही ते म्हणाले.
५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप
माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे पुतणे सूरज रेवण्णा (३७) याने या आरोपाचे स्पष्टपणे खंडन करीत आपल्याकडून ५ कोटी रुपये उकळण्यासाठी खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोपही केला आहे.
दरम्यान, प्रकरण तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आल्याचे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी रविवारी सांगितले. दरम्यान, सूरज याची चौकशी सुरू आहे.