Prakash Abitkar : गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांमध्ये खरंच मारामारी झाली का?; प्रकाश आबिटकर म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 06:01 PM2022-06-26T18:01:37+5:302022-06-26T18:11:42+5:30
Prakash Abitkar : हॉटेलमधील दोन आमदारांमध्ये मारामारी झाल्याचं म्हटलं जात होतं. पण आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० हून आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. बंडखोर आमदारांच्या विरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. याशिवाय, अनेक शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या घराबाहेर तसेच कार्यालयात तोडफोड आणि दगडफेक केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर आमदारांच्या सुरक्षेच्या कारणास्तव केंद्राने सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. य़ाच दरम्यान गुवाहाटीत हॉटेलमधील दोन आमदारांमध्ये मारामारी झाल्याचं म्हटलं जात होतं. पण आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
गुवाहाटीत बंडखोर आमदारांमध्ये मारामारीची घटना खोटी असल्याचं आता समोर आलं आहे. आमदार प्रकाश आबिटकरांनी (Prakash Abitkar) याबाबत खुलासा केला असून कुणीतरी खोडसाळपणे हे वृत्त दिल्याचं म्हटलं आहे. "मी एका स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये गुवाहाटीत असलेल्या आमदारांमध्ये मारहाण झाल्याची बातमी पाहिली होती. या बातमीत माझ्याही नावाचा उल्लेख होता. अशा पद्धतीची कोणतीही घटना या हॉटेलमध्ये घ़डलेली नाही. या सर्व गोष्टी संपूर्णत: अफवा आहेत. अशा अफवांवर कृपया विश्वास ठेवू नका" असं प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटातील १५ बंडखोर आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या आमदारांच्या यादीत असलेले आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच, त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. याशिवाय, वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांच्या कार्यालयाला आणि घराला केंद्राची सुरक्षा देण्यात आली आहे. वैजापूरमध्ये सीआरपीएफचे जवान तैनात झाले असून, त्यांनी बोरनारे यांच्या घराचा ताबा घेतला आहे. तसेच, आज संध्याकाळपर्यंत १५ आमदारांच्या घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, शनिवारी एकनाथ शिंदे गटातील १५ आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी बंडखोर आमदारांच्या फोटोला काळे फासले आहे. तर अनेक ठिकाणी आंदोलनही करण्यात येत आहे. अशात कुटुंबीयांना धोका असल्याची तक्रार काही आमदारांनी केली होती. यानंतर केंद्राने आमदारांच्या कुटुंबीयांना आज संध्याकाळपासून सीआरपीएफ सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.