प्रकाश आंबेडकर मविआचेच; जागावाटपासाठी दिल्लीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 06:56 AM2024-01-10T06:56:49+5:302024-01-10T06:57:39+5:30
प्रकाश आंबेडकर यांना ३ जागा दिल्या जाऊ शकतात
आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: काँग्रेसच्या आघाडी समितीने महाराष्ट्राच्या जागावाटपाबाबत मंगळवारी दिल्लीत चर्चा केली. आजच्या चर्चेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष महाराष्ट्र विकास आघाडीचा भाग असेल, असा निर्णय घेतला. प्रकाश आंबेडकर यांना ३ जागा दिल्या जाऊ शकतात. याशिवाय दक्षिण मुंबई, पुणे, नाशिक आणि दिंडोरी या चार जागांवर बैठकीत एकमत झाले नाही.
मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवावी, अशी काँग्रेसची इच्छा आहे. परंतु शिवसेनेचे असे मत आहे की, ही जागा दहा वर्षांपासून आपल्या ताब्यात आहे. अशा स्थितीत विद्यमान खासदाराची जागा कशी देणार? अशी त्यांची भूमिका आहे. पुण्याची जागा त्यांच्याकडे यावी, अशी राष्ट्रवादीची इच्छा आहे. नाशिक आणि दिंडोरीतील एक जागा काँग्रेसला द्यावी, अशी काँग्रेसची इच्छा आहे.
तोडगा न निघाल्यास...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढविल्या जाऊ शकतात. दक्षिण मुंबई, पुणे, नाशिक आणि दिंडोरी या चार जागांवर बैठकीत एकमत झाले नाही तरी या चार जागांबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी बैठक घेतील आणि त्यावर तोडगा काढतील.
लोकसभेच्या तयारीसाठी खरगे आज दिल्लीत
लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या विविध घटकांवर जबाबदारी सोपविण्यासाठी १० जानेवारीला बैठक बोलावण्यात आली आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी कलबुर्गी येथे सांगितले. या बैठकीसाठी बुधवारी दिल्लीला जाणार असल्याचे ते म्हणाले. पक्षाने मतदारसंघांमध्ये ५००हून अधिक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. उमेदवारांची निवड कशी करायची हे ठरवण्यासाठी बुधवारी कर्नाटकात बैठक होणार आहे. इतर राज्यांमध्येही अशाच बैठका होणार आहेत.
मणिपूरमध्ये भारत जोडो न्याय यात्रेला अद्याप मंजुरी नाही
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा १४ जानेवारीपासून सुरू होणार आहे; परंतु जिथून ही यात्रा सुरू होणार आहे, त्या मणिपूरमधील मैदानासाठी राज्य सरकारने मान्यता दिलेली नाही. पक्षाच्या नेत्यांनी सोमवारी राज्याचे मुख्य सचिव विनीत जोशी यांची भेट घेतली तेव्हा त्यांना हे प्रकरण मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याकडे असल्याचे सांगितले.
काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, कार्यक्रमाच्या परवानगीसाठी आठवडाभरापूर्वी अर्ज करण्यात आला होता. मात्र, अद्याप मंजुरी मिळालेली नाही. ही राजकीय यात्रा नाही, त्यामुळे सरकारने याचे राजकारण करू नये. संकटग्रस्त मणिपूरमधील लोकांच्या जखमा भरून काढणे आणि द्वेष संपवून प्रेमाचा संदेश देणे हा यात्रेचा उद्देश आहे.
यात्रा १४ राज्ये आणि ८५ जिल्ह्यांतून जाणार आहे.