51 कोटी लोकांच्या खात्यात कोट्यवधी दिले, अमित शहांच्या दाव्यावर प्रकाश राज यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 02:28 PM2020-06-11T14:28:49+5:302020-06-11T14:31:30+5:30
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनीही या व्हिडिओवरून केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शाहांचा खरपूस समाचार घेतला आहे.
नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहारमध्ये व्हर्च्युअल रॅली सुरू केली आहे. त्यांच्या व्हर्च्युअल मेळाव्यासंदर्भात एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यात अमित शाह म्हणाले आहेत की, पंतप्रधान मोदींनी कोरोनादरम्यान 51 कोटी लोकांच्या बँक खात्यात कोट्यवधी रुपये पाठवले आहेत. बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनीही या व्हिडिओवरून केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शाहांचा खरपूस समाचार घेतला आहे. तसेच ट्विट करून त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले आहे. मेळाव्यात गृहमंत्र्यांनी हे देखील स्पष्ट केले की, आभासी रॅलीचा बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराशी काही संबंध नाही, परंतु त्याचा संघर्ष कोरोनाच्या विरोधात आहे. मला लोकांशी संपर्क साधायचा आहे.
त्याचवेळी प्रकाश राज यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून अमित शहांचा हा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, "काय लज्जास्पद गोष्ट आहे. खोटेसुद्धा बरोबर बोलू शकत नाहीत." प्रकाश राज यांचे हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. लोकांनीही प्रकाश राज यांच्या या ट्विटवर व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. आभासी मेळाव्यात अमित शहा यांनी विरोधकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यासह ते म्हणाले की, कोरोना संकटात आमचा जनसंपर्काशी असलेला संस्कार आम्ही विसरू शकत नाही. मी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे अभिनंदन करतो की, 75 व्हर्च्युअल मोर्चांद्वारे त्यांनी जनतेशी संपर्क साधण्याची संधी दिली.
What a SHAME ...Even Lies can’t LIE ...#JustAskingpic.twitter.com/7riq0yos7j
— Prakash Raj (@prakashraaj) June 10, 2020
प्रकाश राजबद्दल बोलायचं झाल्यास ते बॉलिवूडमध्ये कलाकार म्हणून अभिनयासाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. आपल्या अभिनयातून दक्षिण चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमध्ये त्यांनी प्रचंड ओळख निर्माण केली आहे. कोरोनाच्या संकटापायी प्रकाश राज हे फॉर्म हाऊसमधल्या शेतात वेळ घालवत आहेत. लॉकडाऊनमध्ये लोकांना मदत करण्यासाठीही ते प्रयत्न करीत आहेत. बर्याच स्थलांतरित मजुरांना जागा देण्याबरोबरच त्यांनी त्यांना घरी पोहोचवण्यास मदत केली. यासह अभिनेत्याने लोकांमध्ये अन्न वाटप देखील केले.