पर्ल्स समूहाचे अध्यक्ष भंगू यांच्यासह चौघांना अटक
By Admin | Published: January 9, 2016 03:37 AM2016-01-09T03:37:24+5:302016-01-09T03:37:24+5:30
पर्ल्स समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक निर्मलसिंग भंगू आणि या समूहाच्या तीन अधिकाऱ्यांना सीबीआयने शुक्रवारी अटक केली.
नवी दिल्ली : पर्ल्स समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक निर्मलसिंग भंगू आणि या समूहाच्या तीन अधिकाऱ्यांना सीबीआयने शुक्रवारी अटक केली. साडेपाच कोटी गुंतवणूकदारांची फसवणूक करीत ४५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा घडवून आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
भंगू हे सध्या पीजीएफ लिमिटेडचे सीएमडी आहेत. ते यापूर्वी पर्ल्स आॅस्ट्रेलेशिया पीटीवाय लिमिटेडचे अध्यक्ष होते. पीएसीएलचे व्यवस्थापकीय संचालक तसेच प्रवर्तक संचालक सुखदेवसिंग, कार्यकारी संचालक(अर्थ)गुरमीतसिंग तसेच पीजीएफ- पीएसीएल पाँझी योजनेचे कार्यकारी संचालक सुब्रत भट्टाचार्य या चौघांना अटक झाल्याचे सीबीआयचे माहिती अधिकारी आर.के. गौर यांनी सांगितले.
या चौघांना सीबीआयच्या मुख्यालयात पाचारण करण्यात आल्यानंतर कसून चौकशी पार पडताच अटक करण्यात आली. या चौघांच्या उत्तरांमध्ये सुसंगती आढळून आली नाही. त्यांनी तपासात सहकार्य देण्याचे टाळले होते, त्याची परिणती अटकेत झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)