मोदींनी २०१४ साली शपथ घेताना मुखर्जींकडे मागितला होता आठवड्याभराचा वेळ, काय होतं कारण?

By मोरेश्वर येरम | Published: January 7, 2021 09:17 AM2021-01-07T09:17:10+5:302021-01-07T09:17:46+5:30

प्रणव मुखर्जी यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात नोटबंदीच्या निर्णयावरुन पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती.

pranab mukerjee book the presidential years pm narendra modi relation | मोदींनी २०१४ साली शपथ घेताना मुखर्जींकडे मागितला होता आठवड्याभराचा वेळ, काय होतं कारण?

मोदींनी २०१४ साली शपथ घेताना मुखर्जींकडे मागितला होता आठवड्याभराचा वेळ, काय होतं कारण?

Next

नवी दिल्ली
देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या The Presidential Years या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतचे अनेक उल्लेख आहेत. मोदी आणि प्रणव मुखर्जी यांच्यात काही मुद्द्यांवरुन विस्तव जात नसल्याचंही अनेक प्रसंगातून दिसून आलं आहे. 

प्रणव मुखर्जी यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात नोटबंदीच्या निर्णयावरुन पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती. तर काही निर्णयांबद्दल कौतुकाचा वर्षाव देखील केला होता. दोन्ही नेत्यांमध्ये वैचारिक मतभेद होते, पण मुखर्जी यांच्या मनात मोदींच्या देशाप्रती असलेल्या समर्पण भावनेबद्दल अत्यंत सन्मान होता. 

२०१४ साली लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना भेटायला आले तेव्हा मोदी त्यांच्यासोबत एका वृत्तापत्राचे कात्रण घेऊन आले होते. मुखर्जींनी दिलेल्या मुलाखतीचे ते कात्रण होते. मुलाखतीत मुखर्जींनी देशाला स्थिर जनादेशाची आशा व्यक्त केली होती. 

"नरेंद्र मोदींनी शपथ ग्रहणासाठी माझ्याकडे एका आठवड्याचा कालावधी मागितला तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. गुजरातमध्ये आपला उत्तराधिकाऱ्याचा मुद्दा सोडवायचा असल्याचं त्यांनी सांगितलं होतं", असं प्रणव मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे. 

मोदींच्या परराष्ट्र नितीने प्रभावित
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र व्यवहार नितीने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी प्रभावित झाले होते. यासाठी पंतप्रधान मोदी अनेकदा सल्ला घेण्यासाठी भेट घ्यायचे. आपल्या शपथविधी सोहळ्याला सार्क परिषदेच्या नेत्यांना निमंत्रित करण्याच्या विचार देखील मोदींनी मांडला होता आणि त्यास मुखर्जी यांनी मंजुरी देत त्यांचं अभिनंदन केलं होतं. यावेळी मुखर्जी यांनी मोदींना देशाच्या गुप्तचर विभागाशी याबाबत चर्चा करण्याचा सल्ला दिला होता. कारण अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि श्रीलंकाच्या राष्ट्रपतींच्या सुरक्षेचा मुद्दा याच्याशी निगडीत होता. 

२०१४ साली भाजपच्या बहुमताबाबतचे विधान
देशात २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी पियूष गोयल यांनी केलेल्या बहुमताच्या दाव्यावर आपल्याला शंका होती, असं मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलंय. "नरेंद्र मोदींचा प्रचाराचा भरगच्च कार्यक्रम पाहिल्यानंतर मी त्यांच्या दाव्याकडे गंभीरतेने पाहू लागलो. मोदी देशाच्या जनतेच्या पसंतीस उतरले आणि त्यांनी आपला दावा सिद्ध करुन दाखवला", असं मुखर्जींनी पुस्तकात म्हटलं आहे.
 

Web Title: pranab mukerjee book the presidential years pm narendra modi relation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.