माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा 'भारतरत्न' पुरस्काराने होणार सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 10:02 AM2019-08-08T10:02:14+5:302019-08-08T11:54:22+5:30
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना 'भारतरत्न' पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना 'भारतरत्न' पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. याचबरोबर, राजकारणातील ऋषी व समाजसेवेतील महर्षी असे व्यक्तिमत्व असलेले दिवंगत नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार दिवंगत भूपेन हजारिका यांनाही भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गुरुवारी (8 ऑगस्ट) हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा जानेवारीमध्ये राष्ट्रपती भवनातून करण्यात आली होती. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे देशाच्या राजकारणातील योगदान मोठे आहे. राष्ट्रपती होण्याआधी प्रणव मुखर्जी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. यूपीए सरकारच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारमध्ये ते सर्वात ज्येष्ठ मंत्री राहिले. तर, नानाजी देशमुख हे महाराष्ट्रातले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवारांच्या विचारांचा प्रभाव नानाजी देशमुख यांच्या मनावर होता. संगीतकार भूपेन हजारिका यांनी आपले संपूर्ण आयुष्य संगीतासाठी घालवले. त्यांची पहाडी आवाजाचा गायक अशी ख्याती होती. भूपेन हजारीका हे त्यांची गाणी स्वतः लिहित आणि संगीतबद्ध करत होते.
Pranab Mukherjee to be awarded Bharat Ratna today
— ANI Digital (@ani_digital) August 8, 2019
Read @ANI Story | https://t.co/72LriMB3Ydpic.twitter.com/4JynkXAmg0
1954 पासून भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. आतापर्यंत 45 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 2015 मध्ये मदनमोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्यात आला होता. त्यानंतर आता प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना जाहीर झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून भारतरत्न पुरस्कारांवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. 'प्रणवदा आमच्या काळातील सर्वोत्कृष्ट राजकीय नेते आहेत. त्यांनी निस्वार्थीपणे देशसेवा केली आहे. मुखर्जी यांना भारतरत्न मिळाल्याबद्दल आनंद होत आहे, असे त्यांनी म्हटले होते. ग्रामीण विकासासाठी नानाजी देशमुख समर्पित होते. ग्रामीण भागातील जनतेला सशक्त करण्यासाठी त्यांनी आपले जीवन वेचले. त्यांची भारतरत्नासाठी केलेली निवड योग्य आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते. याचबरोबर, भूपेन हजारिका यांच्या संगीताचे अनेक चाहते आहेत. भारतीय संगीततज्ज्ञ म्हणून त्यांची जगभर ख्याती आहे. हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न दिल्याबद्दल आनंद होत आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होते.