प्रणव मुखर्जी यांना दुसरी संधी नाही

By admin | Published: May 18, 2017 04:20 AM2017-05-18T04:20:12+5:302017-05-18T04:20:12+5:30

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दुसरी संधी दिली जावी आणि सर्व पक्षांनी सर्वसहमतीने त्यांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून निवडावे हा सल्ला भाजप

Pranab Mukherjee does not have another chance | प्रणव मुखर्जी यांना दुसरी संधी नाही

प्रणव मुखर्जी यांना दुसरी संधी नाही

Next

- हरीश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दुसरी संधी दिली जावी आणि सर्व पक्षांनी सर्वसहमतीने त्यांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून निवडावे हा सल्ला भाजप नेतृत्वाने विनम्रपणे नाकारला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाटण्यात बोलताना असे आवाहन केले होते की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी प्रणव मुखर्जी हे आदर्श उमेदवार ठरू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि अर्थ व संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी गत रविवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी एक बैठक घेतली होती. दुपारी चार वाजता सुरू झालेली ही बैठक ९० मिनिटे चालली होती. अमित शहा हे देशात ९५ दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या बैठकीसाठी ते दिल्लीत दाखल झाले होते आणि एक दिवसाच्या मुक्कामानंतर ते लक्षद्वीपला रवाना झाले. या बैठकीत सद्य राजकीय स्थितीवर चर्चा झाली. विरोधी पक्षांकडे संख्याबळ नसतानाही ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पुढे पावले टाकत असल्याबद्दल मोदी, शहा आणि जेटली यांनी आश्चर्य व्यक्त केले.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गत महिन्यात माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा, जदयूचे शरद यादव आणि नितीशकुमार, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांना राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा करण्यासाठी निमंत्रित केले होते. राष्ट्रपतीपदाची उमेदवारी शरद पवार यांनी विनम्रपणे नाकारली. राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेस आपल्या पक्षाचा उमेदवार पुढे आणणार नाही.
मीरा कुमार यांच्या नावाचा उल्लेख होत असला तरी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना काँग्रेसचा उमेदवार नकोय. दरम्यान, १०, राजाजी मार्ग येथील निवासस्थान प्रणव मुखर्जी यांना निवृत्तीनंतर राहण्यासाठी देण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू झाल्या होत्या तेव्हाच सरकारने प्रणव मुखर्जींबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. या ठिकाणी राहत असलेले केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांना हे निवासस्थान सोडण्याबाबत सरकारने विचारणा केली होती. अर्थात, हा प्रकारच विचित्र होता. कारण राष्ट्रपतींच्या कार्यालयाने नव्या बंगल्याबाबत सरकारशी संपर्कही केला नव्हता अथवा कोणतीही रूची दाखविली नसताना हे सर्व होत होते.
वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर करून मोदी यांना बळ दिले. तेलंगणा राष्ट्रीय समितीही भाजपला पाठिंबा देऊ शकते. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे २४ मे रोजी दिल्लीत येत आहेत. ते पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क करू शकतात. टीआरएसचे नेते ए.पी. जितेंद्र रेड्डी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आम्ही भाजपला मुद्यावर आधारित पाठिंबा देत आहोत. मोदी यांनी शहरी विकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांना अण्णाद्रमुकच्या नेत्यांना भेटण्यासाठी दोन दिवसांपूर्वी चेन्नईला पाठविले होते. ही भेट यशस्वी झाल्याचे सांगितले जात आहे. त्याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही.

भाजपला हवा बिगर काँग्रेसी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती
1 राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत पुढाकार घेणे आणि एका नावासह पुढे येणे हा सत्तारूढ पक्षाचा विशेषाधिकार आहे. राष्ट्रपतीपदासाठी नामांकनाची प्रक्रिया जूनच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होईल. त्यामुळे उमेदवाराबाबत तूर्तास घाई करण्याची आवश्यकता नाही.
2 सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले की, आम्ही सर्वसहमतीच्या बाजूने आहोत. स्वबळावर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना निवडून आणण्याचे संख्याबळ आमच्याकडे आहे. तरीही सर्वसहमतीसाठी आमचा पुढाकार आहे; पण विरोधकांच्या हताशपणामुळे गोंधळ उडाला आहे.
3 आमचे धोरण स्पष्ट आहे. एनडीएचे प्रथमच बिगर काँग्रेसी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती असतील. आम्हाला काँग्रेसमुक्त भारत हवा आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आता काँग्रेसचा राष्ट्रपती होण्याचे स्वप्न पाहू नये.

Web Title: Pranab Mukherjee does not have another chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.