भारताची वाटचाल बाल्कनायझेशनच्या दिशेने, प्रणव मुखर्जींनी व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 12:01 PM2017-10-06T12:01:12+5:302017-10-06T12:03:14+5:30
भारतातील सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थितीबाबत विविध तज्ज्ञ आणि माध्यमं आपापली मतं व्यक्त करत असतानाच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही सामाजिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
कोलकाता - भारतातील सध्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थितीबाबत विविध तज्ज्ञ आणि माध्यमं आपापली मतं व्यक्त करत असतानाच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही सामाजिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. कोलकाता येथे एका मुलाखतीत भारताची वाटचाल आता बाल्कनायझेशनच्या दिशेने सुरू आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
(बाल्कनायझेशन म्हणजे काय ?- दुस-या महायुद्धानंतर युरोपातील बाल्कन प्रदेशात विविध नवे देश तयार होण्याच्या प्रक्रियेला बाल्कनायझेशन म्हणतात.)
भरकटलेली अर्थव्यवस्था, मंदावलेली आर्थिक वृद्धी आणि रोजगार निर्मिती होण्यास आलेले अपयश अशा गंभीर मुद्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी विभाजनाच्या राजकारणाचा वापर केला जातो, याबाबत प्रणव मुखर्जी यांनी आपले मत व्यक्त केले. देशाचे तीन माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, पी.चिदंबरम, डॉ. मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सामाजिक व राजकीय स्थितीबाबत मत व्यक्त केले आहे.
भारताच्या सध्याच्या स्थितीत आता काय केले पाहिजे?, असे विचारताच मुखर्जी यांनी हाच विचार माझ्या डोक्यात घोळत आहे, असे उत्तर दिले. भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदावरुन निवृत्त झाल्यानंतर मुखर्जी आपली मते व विचार जाहीर प्रकट करत राहतील असे त्यांच्या या विधानांवरुन वाटते. 14 ऑक्टोबरला प्रणव मुखर्जी अलिगड मुस्लिम विद्यापिठामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत तर नोव्हेंबर महिन्यात कोलकाता येथे विधान ट्रस्टने इंदिरा गांधी मेमोरियल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होतील तसेच डिसेंबरमध्ये जादवपूर विद्यापीठात ते व्याख्यान देणार आहेत.