प्रणव मुखर्जी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, पंचत्वात विलीन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 02:43 PM2020-09-01T14:43:47+5:302020-09-01T14:45:13+5:30
प्रणव मुखर्जी यांना 10 ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्यातील रक्ताच्या गाठी काढण्यासीठी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. यानंतर त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला. ते व्हेंटीलेटरवर होते.
नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे सोमवारी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर आज (मंगळवार) लोधी स्मशान घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना 10 ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्यातील रक्ताच्या गाठी काढण्यासाठी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. ते व्हेंटीलेटरवर होते. प्रणव दा यांना कोरोना संसर्गदेखील झाला होता. यामुळे एसओपीअंतर्गत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे पुत्र अभिजीत बॅनर्जी आणि कुटुंबातील सदस्यदेखील पीपीई किट घालून उपस्थित होते.
#WATCH Delhi: Former President #PranabMukherjee laid to rest with full military honours.
— ANI (@ANI) September 1, 2020
His last rites were performed at Lodhi crematorium today, under restrictions for #COVID19. pic.twitter.com/VbwzZG1xX9
राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह अनेकांनी प्रणव मुखर्जींना अर्पण केली श्रद्धांजली -
तत्पूर्वी, 10 राजाजी मार्ग येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण केली. केंद्र सरकार ने त्यांच्या सन्मानार्थ 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यंत सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. यानंतर पश्चिम बंगाल सरकारनेही दुखवटा जाहीर केला आहे. सोमवारी प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पीएम मोदी, अमित शाह, लालकृष्ण आडवाणी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला.
प्रणव मुखर्जी यांनी २०१२ ते २०१७ या काळात देशाचे राष्ट्रपतीपद सांभाळले होते. तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये वित्त, संरक्षण, परराष्ट्र यासह विविध महत्त्वपूर्ण पदांवर काम केले होते. तसेच लोकसभा आणि राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले होते. त्याबरोबरच विविध संसदीय समित्यांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली होती. प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने भारतरत्न देऊन सन्मानित केले होते.