प्रणवदांनी माझी पित्याप्रमाणे काळजी घेतली!

By Admin | Published: July 4, 2017 04:47 AM2017-07-04T04:47:24+5:302017-07-04T04:47:24+5:30

प्रणव मुखर्जी देशाच्या सर्वोच्च पदावरून पायउतार होण्यास काही दिवस राहिलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी

Pranavad took care of my father! | प्रणवदांनी माझी पित्याप्रमाणे काळजी घेतली!

प्रणवदांनी माझी पित्याप्रमाणे काळजी घेतली!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : प्रणव मुखर्जी देशाच्या सर्वोच्च पदावरून पायउतार होण्यास काही दिवस राहिलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मावळत्या राष्ट्रपतींबद्दलचा आपल्या मनातील अतीव आदारभाव आणि दोघांमध्ये जुळलेले घट्ट भावबंध यांची भावूक होऊन मोकळ््या मनाने जाहीर वाच्यता केली.
निमित्त होते मुखर्जी यांच्या पाच वर्षांच्या राष्ट्रपतीपदावरील कारकिर्दीचा चित्रमय आढावा घेणाऱ्या ‘प्रेसिडेंट प्रणव मुखर्जी- ए स्टेट््समन’ या पुस्तकाच्या राष्ट्रपतीभवनात झालेल्या प्रकाशनाचे. पुस्तकाचे अनावरण करून त्याची पहिली प्रत राष्ट्रपतींना देऊन नंतर केलेल्या भाषणात मोदी म्हणाले की, पंतप्रधान झालो तेव्हा दिल्लीत मी नवखा होतो. पण प्रणवदांचे बोट धरून स्थिरस्थावर होण्याचे भाग्य मला लाभले. तीन वर्षांच्या काळात आमच्या अनेक वेळा भेटी झाल्या, पण राष्ट्रपतींनी माझी पितृवत काळजी घेतली नाही, असे त्यापैकी एकदाही घडले नाही.
मनात उचंबळून आलेले भाव मोदींच्या देहबोलीतूनही स्पष्ट होत होते. दाटलेल्या कंठाला आवर घालत ते म्हणाले की, केवळ औपचारिकता म्हणून नव्हे तर मनाच्या अगदी आतल्या कप्प्यातून मी हे बोलत आहे....प्रणबदांनी मला मुलाप्रमाणे वागविले हे सांगितल्यावाचून माझे मन मोकळे होणार नाही!
ूपंतप्रधान म्हणाले: राष्ट्रपतीजी मला नेहमी म्हणायचे, मोदीजी तुम्ही अर्धा दिवस तरी आराम करायला हवा. एवढी धावपळ कशाला करता? थोडे कार्यक्रम कमी करा. प्रकृतीची काळजी घ्या.
मोदी असेही म्हणाले की, खास करून उत्तर प्रदेश निवडणुकीच्या काळात प्रणबदा मला सांगायचे की, मोदीजी हार-जीत होतच राहते. पण त्यामागे न लागता आपल्या शरीराची काळजी घ्याल की नाही? खरे तर राष्ट्रपती या नात्याने त्यांच्या जबाबदारीत हे कुठे बसत नव्हते. पण तरीही त्यांच्यात असलेला एक मोठ्या मनाचा माणूस मला हे काळजीने सांगत असे.
मुखर्जी यांच्या व्यक्तिमत्व स्फूर्तिदायी आहे व माझ्या आयुष्यात ज्या प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती आल्या त्यात त्यांचे स्थान वरचे आहे, असेही मोदींनी आवर्जून नमूद केले.
राष्ट्रपतींनी अशा प्रकारे चिंता व्यक्त करणे रास्तच होते पण लवकर काम संपले तर संध्याकाळी काय करायचे हा माझ्यापुढे प्रश्न पडायचा, अशी आपली अडचणही मोदींनी बोलून दाखविली.
लोकांना कार्यक्रमांमध्ये परिटघडीच्या राजशिष्टाचारानुसार वागणारे-बोलणारे राष्ट्रपती दिसतात. पण या पुस्तकातून आपले राष्ट्रपती एखाद्या निरागस मुलाप्रमाणे हसतातही हे जनतेपुढे येईल. त्यांच्यातल माणूस त्यांना कळेल, असे सांगून मोदींनी या पुस्तकाचे कौतुक केले.
प्रणवदांच्या मध्यम उंचीच्या अंगकाठीचा थेट उल्लेख खुबाने टाळत मोदी असेही म्हणाले की, आलेला परदेशी पाहुणा कितीही मोठा असो त्याच्यापुढे आपले राष्ट्रपती किती आत्मविश्वासाने देशाची मान उंच ठेवतात हेही या पुस्तकातून लोकांना पाहायला मिळेल!
मोदी म्हणाले, गोवा पूर्वी ज्या पोर्तुगालची वसाहत होती तेथे मी आत्ताच जाऊन आलो. त्या काळात पोर्तुगाल आणि गोवा यांच्यात झालेला सर्व शासकीय पत्रव्यवहार अभ्यासकांना उपलब्ध करून देण्याची माझी विनंती पोतुर्गीज पंतप्रधानांनी मान्य केली. यामुळे एरवी इंग्रजांच्या सरकारी दफ्तरावर विसंबून राहाव्या लागणाऱ्या अभ्यसकांची सोय होईल. यावरून लिखित इतिहासाचे जतन करण्याचे महत्वच अधोरेखित होते.

राष्ट्रपतींनी केले तोंडभरून कौतुक

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही आपल्या भाषणात पंतप्रधान या नात्याने आपल्या मनात असलेली आदराची व कौतुकाची भावना व्यक्त केली. प्रसंगी मतभेदही झाले, पण ते आपल्याजवळ ठेवून आम्ही दोघे अत्यंत निकट सहकार्याने कर्तव्य बजावू शकलो. मतभेदांचा परिणाम राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंधांवर झाला नाही, असे ते म्हणाले.
गेल्या तीन वर्षांच्या काळात आमच्या दोघांमधील सरकारी कामांत कधी अडथळे आले नाहीत, ते कधी थांबले नाही की त्यास विलंब झाला नाही, हे मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो, असेही मुखर्जी म्हणाले.
वित्तमंत्री अरुण जेटली हेही कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांचा उल्लेख करत राष्ट्रपती म्हणाले की, अनेक वेळा मी जेटली यांना विचारायचो व त्यांच्यातील मुरब्बी वकील सरकारची बाजू मला यशस्वीपणे पटवून द्यायचा.

Web Title: Pranavad took care of my father!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.