सीबीआयकडून प्रणय रॉय यांच्या घराची झाडाझडती

By admin | Published: June 6, 2017 04:44 AM2017-06-06T04:44:27+5:302017-06-06T04:44:27+5:30

खासगी बँकेचे नुकसान केल्याप्रकरणी एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणय रॉय यांच्या घरासह चार ठिकाणी सीबीआयने सोमवारी धाडी टाकल्या

Pranay Roy's house tree plantation by the CBI | सीबीआयकडून प्रणय रॉय यांच्या घराची झाडाझडती

सीबीआयकडून प्रणय रॉय यांच्या घराची झाडाझडती

Next

शीलेश शर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : समभागांची देवाणघेवाण सेबीपासून लपविणे व खासगी बँकेचे नुकसान केल्याप्रकरणी एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणय रॉय यांच्या घरासह चार ठिकाणी सीबीआयने सोमवारी धाडी टाकल्या. ही झडती खोट्या आरोपांवरून सूडभावनेने केलेली कारवाई असल्याचे चॅनेलने म्हटले. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आपनेही ही कारवाई सूडभावनेने झाल्याची टीका केली आहे.
सीबीआयने आरआरपीआर होल्डिंग्ज प्रा. लि., प्रणय रॉय, त्यांच्या पत्नी राधिका आणि आयसीआयसीआयच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हेगारी कट, फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला. आरआरपीआर होल्डिंग्जने जनतेकडून एनडीटीव्हीचे २० टक्के समभाग खरेदी करण्यासाठी इंडिया बुल्स प्रा. लि.कडून कथितरीत्या ५०० कोटींचे कर्ज घेतले होते. आरआरपीआर होल्डिंग्जने इंडिया बुल्सची उधारी चुकती करण्यासाठी १९ टक्के प्रतिवर्ष दराने आयसीआयसीआय बँकेकडून ३७५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. एनडीटीव्हीच्या प्रमोटरांनी आपले सर्व समभाग गहाण ठेवून हे कर्ज घेतले होते, असा सीबीआयचा आरोप आहे. समभाग गहाण ठेवण्यात आल्याची बाब सेबी, स्टॉक एक्स्चेंज तसेच माहिती व प्रसारण मंत्रालयापासून लपवून ठेवण्यात आली. या व्यवहारात कथितरीत्या ६१ टक्क्यांहून अधिक मताधिकार भांडवलाची निर्मिती केली गेली. वास्तविक बँकिंग नियमन कायदा कलम १९(२) अनुसार हे प्रमाण ३० टक्क्यांहून अधिक असता कामा नये. कायद्याचे उल्लंघन होत असल्यामुळेच याबाबतची माहिती दडवून ठेवण्यात आली, असा सीबीआयचा आरोप आहे. आयसीआयसीआयने व्याजात १० टक्क्यांची सूटही दिली. या व्यवहारात आयसीआयसीआय बँकेला ४८ कोटी रुपयांचा तोटा, तर आरआरपीआरला फायदा झाला असल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
ममतांना धक्का
या धाडीमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे. रॉय हे आदरणीय व्यक्ती असून, अशी कारवाई चुकीची आहे, असे त्या म्हणाल्या. रॉय यांच्यावरील सीबीआय धाडीचा दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी निषेध केला आहे.
लढा देत राहू
सीबीआयने आज सकाळी जुन्या खोट्या आरोपांच्या आधारे एनडीटीव्ही आणि प्रमोटरांचा संघटित छळ आणखी वाढवला. एनडीटीव्ही आणि त्याचे प्रमोटर विविध एजन्सींकडून सुरू असलेल्या या सुडाच्या कारवाईविरुद्ध सातत्याने लढा देतील, असे एनडीटीव्हीने एका निवेदनात म्हटले.
भारतातील लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कमकुवत करण्याच्या या प्रयत्नांसमोर आम्ही गुडघे टेकणार नाही. भारताची प्रतिष्ठाने आणि भारत ज्या गोष्टींसाठी उभा आहे त्यांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आम्ही संदेश देऊ इच्छितो की, आम्ही देशासाठी लढू आणि यावर विजय मिळवू.
हस्तक्षेप नाही - नायडू
या धाडीत सरकारी हस्तक्षेप नसून कायदा त्याचे काम करीत आहे, कोणी केवळ प्रसिद्धीमाध्यमाशी संबंधित असल्यामुळे चुकीचे काम करीत असेल तर सरकार गप्प बसेल, अशी अपेक्षा तुम्हाला करता येणार नाही, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.
सत्तेचा दुरुपयोग
ज्येष्ठ काँग्रेस नेते आनंद शर्मा यांना केंद्रावर टीका केली आहे. सत्तेचा दुरुपयोग सुरू असल्याचा घणाघात त्यांनी केला. माध्यमे आणि इतर असंतुष्ट आवाजांना दडपण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. आमचे ऐका अन्यथा तुमचाही रॉय होईल, असा संदेश माध्यमांना देण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Pranay Roy's house tree plantation by the CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.