तिरुपती देवस्थानात आता स्वयंचलित यंत्राद्वारे बनणार प्रसादाचे लाडू; मंदिर संकुलात संग्रहालय उभारणीचे काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 06:48 AM2023-02-06T06:48:57+5:302023-02-06T06:50:10+5:30
देवस्थानामध्ये जानेवारीत २०.७८ लाख भाविकांनी दर्शन घेतले. तसेच ३२.३८ लाख लोकांना प्रसादाचा लाभ घेतला. तर ७.५१ लाख लोकांनी देवाला केस अर्पण केले. जानेवारीत भाविकांनी देवस्थानाला १२३ कोटी रुपयांच्या देणग्या किंवा वस्तू अर्पण केल्या तसेच देवस्थानाने प्रसादाच्या १.०७ कोटी लाडूंचे वाटप केले.
तिरुमला : आंध्र प्रदेशमधील तिरुपती देवस्थानात लवकरच स्वयंचलित यंत्राद्वारे प्रसादाचे हजारो लाडू बनविले जाणार आहेत. ५० कोटी रुपये किमतीचे हे यंत्र रिलायन्स उद्योगसमूह तिरुपती देवस्थानात बसवून देणार आहे, अशी माहिती त्या देवस्थानचे कार्यकारी अधिकारी ए.व्ही. धर्मा रेड्डी यांनी दिली आहे. या यंत्रामुळे प्रसादाचे लाडू बनविण्याचे मोठे काम अधिक सुलभ होईल.
रेड्डी यांनी सांगितले की, तिरुपती देवस्थानाच्या परिसरात एक संग्रहालय उभारण्यात येत आहे. या देवाचे दागिने यांचे थ्रीडी स्वरूपातील दर्शन या संग्रहालयात भाविकांना घेता येईल. तिरुपती मंदिराच्या संकुलात आकाशगंगा येथे उभारण्यात येणारे अंजनाद्री मंदिर बांधण्यासाठी ५० ते ६० कोटी रुपये खर्च येणार आहे.
२० लाख भाविक...
देवस्थानामध्ये जानेवारीत २०.७८ लाख भाविकांनी दर्शन घेतले. तसेच ३२.३८ लाख लोकांना प्रसादाचा लाभ घेतला. तर ७.५१ लाख लोकांनी देवाला केस अर्पण केले. जानेवारीत भाविकांनी देवस्थानाला १२३ कोटी रुपयांच्या देणग्या किंवा वस्तू अर्पण केल्या तसेच देवस्थानाने प्रसादाच्या १.०७ कोटी लाडूंचे वाटप केले.
सोन्याच्या लेपनासाठी जागतिक निविदा
देवस्थानात आनंद निलायम इमारतीत सोन्याच्या लेपनाचे काम पुढे ढकलण्यात आले आहे. त्यासाठी जागतिक स्तरावर निविदा काढून हे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी ए.व्ही. धर्मा रेड्डी यांनी दिली.