अॅड. प्रशांत भूषण खटल्याचा आज निकाल लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 04:13 AM2020-08-31T04:13:55+5:302020-08-31T04:14:28+5:30
न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने १४ आॅगस्ट रोजी दोषी ठरविले. अवमानप्रकरणी न्यायालयाने माफी मागायला सांगूनही प्रशांत भूषण यांनी त्यास नकार दिला.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचा कारभार व सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या विरोधात दोन टष्ट्वीटद्वारे शेरेबाजी करणारे ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याच्या आरोपावरून दाखल केलेल्या खटल्याचा न्यायालय सोमवारी निकाल देणार आहे.
न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने १४ आॅगस्ट रोजी दोषी ठरविले. अवमानप्रकरणी न्यायालयाने माफी मागायला सांगूनही प्रशांत भूषण यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सोमवारी सकाळी १०.३० वाजता या खटल्याचा निकाल देणार आहे.
न्यायालयाच्या अवमानासंदर्भातील कायद्यानुसार दोषी व्यक्तीला सहा महिने कारावास किंवा २ हजार रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. याआधीच्या अशा प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या वकिलांना काही काळापर्यंत वकिली करण्यास न्यायालयाने बंदी घातली होती. हीच त्यांना शिक्षा देण्यात आली होती. अशा प्रकरणात आतापर्यंत एकाही वकिलाला कारावासाची शिक्षा न्यायालयाने दिलेली नाही.
ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्यावरील खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने २५ आॅगस्ट रोजी राखून ठेवला होता. प्रशांत भूषण यांनी २७ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या व २९ जून रोजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या विरोधात टष्ट्वीट केले होते.
न्यायालयाने याचिकेची घेतली स्वत:हून दखल
या टष्ट्वीटविरोधात अॅड. मेहेक महेश्वरी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या याचिकेत होती. अशा याचिकेला अटर्नी जनरल यांची सहमती लागते; पण तशी ती घेण्यात आली नव्हती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून या याचिकेची दखल घेऊन २२ जुलैला प्रशांत भूषण यांना नोटीस जारी केली होती.
.........