Prashant Kishor : "...तर मी संन्यास घेईन"; नितीश कुमारांच्या यू-टर्नवर प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 16:10 IST2024-01-28T15:56:19+5:302024-01-28T16:10:50+5:30
Prashant Kishor And Nitish Kumar : नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधताना प्रशांत किशोर म्हणाले होते की, नितीश कुमार इंडिया आघाडीसोबत निवडणूक लढले तर लोकसभा निवडणुकीत त्यांना पाचही जागा मिळणार नाहीत.

Prashant Kishor : "...तर मी संन्यास घेईन"; नितीश कुमारांच्या यू-टर्नवर प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल
बिहारमध्ये राजकीय वातावरण तापलेलं असतानाच प्रशांत किशोर यांनी मोठं विधान केलं आहे. "आजच्या घटनेमुळे सिद्ध झालं की, बिहारमध्ये फक्त नितीश कुमारच नाही तर सर्व पक्ष 'पलटूराम' आहेत" असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर 2025 च्या निवडणुकीत युती टिकू शकणार नाही, या घटनेमुळे भाजपाचं मोठं नुकसान होणार आहे असा दावाही त्यांनी केला.
प्रशांत किशोर म्हणाले की, "नितीश कुमार धूर्त आहेत. बिहारच्या जनतेची केलेली फसवणूक, बिहारचे लोक व्याजासह परत करतील. लोकसभा निवडणूक सोडा. पलटी मारा असं आम्ही तुम्हाला सांगितलं नव्हतं. नितीश कुमार लढले तरी पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 20 जागाही मिळणार नाहीत. जागा मिळाल्या तर मी आपल्या कामातून संन्यास घेईन."
याआधी देखील नितीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधताना प्रशांत किशोर म्हणाले होते की, नितीश कुमार इंडिया आघाडीसोबत निवडणूक लढले तर लोकसभा निवडणुकीत त्यांना पाचही जागा मिळणार नाहीत. पाचपेक्षा जास्त जागा मिळाल्यास ते जाहीर माफी मागतील.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी लालू यादव यांच्या पक्षावर हल्लाबोल केला. राजभवनातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नितीश कुमार म्हणाले, माझ्या पक्षाचं मत लक्षात घेतल्यानंतर मी राजीनामा दिला. सरकारच्या सर्व कामांचे श्रेय ते (आरजेडी) घेत आहे, मी काम करत होतो पण मला काम करू दिलं जात नव्हतं, दोन्ही बाजूंनी त्रास होता.