प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 06:59 PM2024-10-02T18:59:23+5:302024-10-02T19:00:41+5:30
Prashant Kishor Jan Suraj : निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी 'जन सुराज' नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला आहे.
Prashant Kishor Jan Suraj : प्रशांत किशोर यांनी आज(2 ऑक्टोबर) आपल्या 'जन सूराज' पक्षाची अधिकृत घोषणा केली आहे. निवडणूक रणनीतीकार म्हणून नावारुपाला आलेल्या पीकेंनी आता बिहारमधून सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. आज, पाटण्यात आयोजित कार्यक्रमातून त्यांनी पक्ष स्थापनेची घोषणा केली. आपल्या पक्षाच्या माध्यमातून त्यांना बिहारच्याराजकारणात वादळ निर्माण करण्याची आशा आहे. दरम्यान, पीकेंनी मनोज भारती यांना पक्षाचे कार्यकारिणीचे अध्यक्ष केले आहे.
#WATCH पटना, बिहार जन सुराज के संस्थापक प्रशांत किशोर ने आधिकारिक तौर पर अपनी राजनीतिक पार्टी - जन सुराज पार्टी की शुरूआत की।
— ANI_HindiNews (@AHindinews) October 2, 2024
प्रशांत किशोर ने कहा, "जन सुराज अभियान 2-3 साल से चल रहा है। लोग पूछ रहे हैं कि हम पार्टी कब बनाएंगे। हम सभी को भगवान का शुक्रिया अदा करना चाहिए, आज… pic.twitter.com/DW8LVIJmYc
माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रसाद यादव, प्रशासकीय सेवेतून राजकारणात आलेले पवन वर्मा, माजी खासदार मोनाजीर हसन यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत पाटण्यात जन सुराजचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना पीके म्हणाले की, जन सुराज मोहीम अनेक दिवसांपासून सुरू आहे. पक्ष कधी काढणार, असा प्रश्न अनेकजण मला विचारत होते. आता आज निवडणूक आयोगाने अधिकृतपणे 'जन सूराज'ला पक्ष म्हणून मान्यता दिली आहे.
पक्ष स्थापनेपूर्वी पदयात्रा
महात्मा गांधींनी लोकांना एकत्र आणण्यासाठी देशातील पहिला सत्याग्रह केला, त्या चंपारण येथून प्रशांत किशोर यांनी अडीच वर्षांपूर्वी राज्यभरात 3,000 किमीची 'पदयात्रा' सुरू केली होती. राज्यातील लोकांना एक नवीन पर्याय देणार, बिहारला मागासलेपणातून मुक्त करणार, असा अजेंडा घेऊन पीकेंनी आपल्या पदयात्रेला सुरुवात केली होती. या पदयात्रेत पीकेंनी संपूर्ण बिहार पिंजून काढले. आपल्या यात्रेदरम्यान पीकेंनी दर्जेदार शिक्षण, चांगल्या वैद्यकीय सेवा, राज्यात रोजगाराच्या संधी देण्यावर भर दिला. आता आज अखेर त्यांनी पक्ष स्थापन करुन सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे.
कोण आहेत मनोज भारती?
प्रशांत किशोर यांनी मनोज भारती यांना जन सूरज पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बनवले आहे. भारतीय परराष्ट्र सेवेतून (IFS) निवृत्त झालेल मनोज भारती दलित समाजातून येतात. जन सूरज पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष निवडण्यासाठी प्रशांत किशोर यांनी 100 नावांची यादी मागवली होती. यातून मनोज यांच्या नावाची निवड करण्यात आली. पुढील वर्षी मार्चपर्यंत मनोज या पदावर राहणार आहेत.
पुढील वर्षी नवीन अध्यक्षाची निवड
मनोज यांच्या निवडीची घोषणा करताना प्रशांत किशोर म्हणाले की, दलित समाजातील कोणीतरी अध्यक्ष होईल, असे आम्ही म्हटले होते. प्रत्येक समाजात एक कर्तबगार माणूस असतो, अशी आमची विचारसरणी आहे. प्रत्येकाला संधी दिली जाईल. पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड पुढील वर्षी मार्चपर्यंत केली जाईल.