२७ लाख vs २२ कोटी मतं... आम आदमी पक्षाला आणखी २० वर्ष लागतील, प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 01:58 PM2022-03-30T13:58:29+5:302022-03-30T13:59:07+5:30

Prashant Kishor News: आम आदमी पक्ष राष्ट्रीय पातळीवरील पक्ष होण्याबाबत आणि केंद्रात भाजपला टक्कर देण्याबाबत एक मोठी भविष्यवाणी प्रशांत किशोर यांनी केली आहे.

Prashant Kishor On Aap And Aam Aadmi Party National Aspiration | २७ लाख vs २२ कोटी मतं... आम आदमी पक्षाला आणखी २० वर्ष लागतील, प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी!

२७ लाख vs २२ कोटी मतं... आम आदमी पक्षाला आणखी २० वर्ष लागतील, प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी!

Next

नवी दिल्ली- 

पंजाब विधानसभा निवडणुकीत (Punjab Election Result 2022) अभूतपूर्व विजय प्राप्त केल्यानंतर आम आदमी पक्षानं (AAP) राष्ट्रीय पातळीवर वर्चस्व गाजवण्याची तयारी सुरू केली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या नेत्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पण निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एक 'आप'बाबत एक महत्वाचं विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार केंद्रात भारतीय जनता पक्षाचा (BJP) मुकाबला करण्यासाठी 'आप'ला किमान १५ ते २० वर्षे लागू शकतात.

प्रशांत किशोर यांनी आकडेवारीच दाखवली
एका न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी आपल्या वक्तव्यासोबत आकडेवारीही मांडली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत 'आप'ला एकूण २७ लाख मतं मिळाली होती. या देशात कोणत्याही पक्षाचं सरकार बनवायचं किंवा देश जिंकायचा असेल तर २० कोटींहून अधिक मतांची गरज आहे. एवढी मतं मिळविण्यासाठी केवळ काही वर्षे पुरेशी नसतील. कोणत्याही पक्षाला या पदावर यायला अनेक दशकं लागतात, असं प्रशांत किशोर म्हणाले. 

'आप'ला १५-२० वर्षे लागतील
'आप'ला भाजपला टक्कर देण्यासाठी बराच काळ द्यावा लागेल. यास 15 ते 20 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी लागू शकतो. एका रात्रीत काहीही होऊ शकत नाही. एक किंवा दोन राज्य जिंकणं ही वेगळी गोष्ट आहे, पण लोकसभा निवडणूक जिंकणं काही सोपी गोष्ट नाही, असं प्रशांत किशोर म्हणाले. 

फक्त काँग्रेस आणि भाजप हे पॅन इंडिया पक्ष
"तत्वतः कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाची श्रेणी मिळू शकते. पण लोकसभा निवडणूक जिंकणं ही वेगळी बाब आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात काँग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष पॅन इंडिया पक्ष बनले आहेत. इतर कोणत्याही पक्षाला असं स्थान मिळवता आलेलं नाही. असं करण्यासाठी किमान १५-२० वर्षे प्रयत्न करावे लागतील", असेही ते म्हणाले. एवढा मोठा बदल रातोरात होत नाही. भाजपा आज ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत यायला पक्षाला ५० वर्षे लागली. भाजपने १९७८ मध्ये प्रयत्न सुरू केले आणि अनेक वर्षांनी युतीनं सरकार स्थापन करण्यात त्यांना यश आलं होतं, असंही प्रशांत किशोर म्हणाले. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला भरघोस मतं
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठं जनसमर्थन मिळालं होतं. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला १७.१६ कोटी मतं मिळाली होती. पण २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांबद्दल बोलायचं झालं तर भाजपच्या मतांची टक्केवारी आणखी वाढली. २०१९ च्या लोकसभेत ३०० हून अधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला एकूण २२.९० कोटी मतं मिळाली. २०१९ मध्ये भाजपला उत्तर प्रदेश (४.२८ कोटी), पश्चिम बंगाल (२.३० कोटी), मध्य प्रदेश (२.१४ कोटी), राजस्थान (१.९० कोटी), गुजरात (१.८० कोटी) आणि महाराष्ट्रात (१.४९ कोटी) मतं मिळाली.
 

Web Title: Prashant Kishor On Aap And Aam Aadmi Party National Aspiration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.