प्रशांत किशोर यांचा जामीन घेण्यास नकार, तुरुंगातच राहणार, तिथेच उपोषण करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 17:36 IST2025-01-06T17:35:25+5:302025-01-06T17:36:00+5:30
Prashant Kishor: प्रशांत किशोर यांना कोर्टाने सशर्त जामीन देऊ केला होता. त्यानुसार त्याना आता कुठलंही आंदोलन करता येणार नव्हतं. मात्र प्रशांत किशोर यांनी हा सशर्त जामीन घेण्यास नकार दिला. त्यानंतर कोर्टाने प्रशांत किशोर यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे

प्रशांत किशोर यांचा जामीन घेण्यास नकार, तुरुंगातच राहणार, तिथेच उपोषण करणार
मागच्या काही दिवसांपासून बिहारच्या राजकारणात प्रशांत किशोर यांनी आक्रमकपणे आपलं स्थान निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच प्रशांत किशोर यांनी बीपीएससीच्या ७० व्या प्राथमिक परीक्षेला रद्द करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई करून न्यायालयात हजर केल्यानंतर किशोर यांनी सशर्त जामीन घेण्यास नकार देत तुरुंगातूनच उपोषण सुरू ठेवण्याची घोषणा केली होती.
बीपीएससी परीक्षेच्या मुद्द्यावरून आमरण उपोषण करत असलेल्या प्रशांत किशोर यांना गांधी मैदान येथील उपोषण स्थळावरून आज पहाटे चार वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर किशोर यांना न्यायालयात हजर केले असता प्रशांत किशोर यांनी जामिनासाठीचा बॉण्ड भरण्यास नकार दिला. त्यानंतर प्रशांत किशोर यांची कोर्टाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
यादरम्यान, प्रशांत किशोर यांचा एक व्हिडीओ सोश मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये कोर्ट परिसरातून ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिसत आहेत. तसेच तुरुंगातूनच आमरण उपोषण सुरू राहील, असे सांगत आहेत. प्रशांत किशोर पुढे म्हणाले की, आपल्याला थांबायचं नाही आहे. जर थांबलो तर सरकारची हिंमत वाढेल. त्यामुळे मी जामीनसुद्धा घेणार नाही. तसेच उपोषणही सोडणार नाही. प्रशासनाला जे काही करायचं आहे ते करू दे. यांना वाटलं की उचलून नेलं आणि जामीन दिला की, संपूर्ण प्रकरण संपेल, असे प्रशांत किशोर म्हणाले.
कोर्टामध्ये वरिष्ठ वकील वाय. बी. गिरी यांनी प्रशांत किशोर यांची बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, प्रशांत किशोर यांना कोर्टाने सशर्त जामीन देऊ केला होता. त्यानुसार त्याना आता कुठलंही आंदोलन करता येणार नव्हतं. मात्र प्रशांत किशोर यांनी हा सशर्त जामीन घेण्यास नकार दिला. त्यानंतर कोर्टाने प्रशांत किशोर यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.