भाजपला टक्कर देण्यासाठी केजरीवालांची प्रशांत किशोर यांच्याशी हातमिळवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 11:42 AM2019-12-14T11:42:31+5:302019-12-14T11:44:41+5:30
प्रशांत किशोर यांनी 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणूक जवळ येताच राजधानीतील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टी केवळ आपल्या कामाच्या आधारवर मत मागणार असल्याचे सांगत आहे. त्यातच आपने विधानसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी हातमिळणी केली आहे. दिल्लीत आपची डायरेक्ट लढत भाजपसोबत होणार असून काँग्रेसही स्पर्धेत राहणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या संदर्भात माहिती दिली. त्यांनी एक ट्विट केले असून ते म्हणाले की, इंडियन पॉलिटीकल एक्शन कमिटी (I-PAK) आमच्यासोबत येत आहे. तुमचे स्वागत आहे.
Happy to share that @indianpac is coming on-board with us. Welcome aboard!
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 14, 2019
इंडियन पॉलिटीकल एक्शन कमिटी औपचारीकरित्या राजकीय पक्षांचा प्रचार करते. त्यामुळे अर्थात दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर आम आदमी पक्षाचा प्रचार करताना दिसणार आहेत. तसेच किशोर हे जनता दल युनाईटेडचे उपाध्यक्ष देखील आहे. त्यांनी 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यानंतर त्यांनी बिहारमध्ये नितीश कुमार यांचा प्रचार केला होता. ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. तर 2017 मध्ये त्यांनी अमरिंदर सिंग यांचाही प्रचार केला. ते देखील सत्तेत आले. मात्र उत्तर प्रदेशात प्रशांत किशोर यांना सोबत घेऊन दारुण पराभव पत्करावा लागला होता.