ज्याला मुख्यमंत्री केलं, त्याच्याच कट्टर विरोधकाला बळ देणार? प्रशांत किशोर यांच्या भेटीने चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 12:41 PM2023-12-24T12:41:03+5:302023-12-24T12:45:29+5:30
प्रशांत किशोर यांच्या आयपॅक या संस्थेने २०१९ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाची रणनीती आखली होती.
Prashant Kishore ( Marathi News ) : मागील काही वर्षांत भारतीय राजकारणात तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने आखल्या जाणाऱ्या रणनीतीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. निवडणूक रणनीतीच्या बाबतीत भारतात सर्वाधिक चर्चिले जाणारे नाव म्हणजे प्रशांत किशोर. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नंतरच्या काळात विविध राजकीय पक्षांच्या विजयात प्रशांत किशोर यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. याच प्रशांत किशोर यांच्या आयपॅक या संस्थेने २०१९ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाची रणनीती आखण्याचं काम पाहिलं होतं आणि त्या निवडणुकीत रेड्डी यांच्या पक्षाला प्रचंड बहुमतही मिळालं होतं. मात्र पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मात्र ही संस्था जगनमोहन रेड्डी यांचे पारंपरिक विरोधक असलेल्या टीडीपी पक्षाचे काम करणार असल्याचे समजते. याच पार्श्वभूमीवर नुकतीच टीडीपीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू आणि प्रशांत किशोर यांची भेटही झाली आहे.
प्रशांत किशोर यांनी चंद्रबाबू नायडू यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांनी राज्यातील राजकीय स्थितीबाबत सविस्तर चर्चा केली. मी यापुढे कोणत्याही राजकीय पक्षाचा निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करणार नसल्याची घोषणा प्रशांत किशोर यांनी यापूर्वीच केली आहे. मात्र असं असतानाही त्यांनी चंद्रबाबू नायडू यांची भेट घेऊन तब्बल तीन तास खलबतं केल्याने ते टीडीपीच्या रणनीतीला हातभार लावणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
भेटीनंतर काय म्हणाले प्रशांत किशोर?
प्रशांत किशोर यांनी चंद्रबाबू नायडू यांच्या भेटीनंतर ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं आहे. "अनेक दिवसांपासून आमची ही भेट प्रलंबित होती आणि मी त्यांना म्हटलं होतं की एखाद्या दिवशी भेटायला येईल. त्यानुसार आज मी आलो आहे," असा खुलासा किशोर यांनी केला आहे.
वायएसआर काँग्रेसने साधला निशाणा
प्रशांत किशोर आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भेटीनंतर वायएसआर काँग्रेस पक्षाच्या एकामागोमाग एक करत अनेक नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. "जेव्हा मूळ साहित्यच खराब असेल तर गवंडी येऊन तरी काय करणार," अशा शब्दांत जगनमोहन रेड्डी यांचे खंदे समर्थक आणि आंध्र प्रदेशचे जलसंपदा मंत्री ए रामबाबू यांनी या भेटीवर टीका केली आहे.