केवळ आश्वासनं, मदत नाही; अनाथ मुलांसाठी सरकारनं केलेल्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 08:04 PM2021-05-30T20:04:23+5:302021-05-30T20:07:52+5:30
अनाथ मुलांसाठी पीएम केअर्स फंडातून १० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. यावरून प्रशांत किशोर यांनी साधला निशाणा.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर किंचित कमी होताना पाहायला मिळत आहे. देशात नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना पाहायला मिळत असली, तरी मृत्यूंचे वाढलेले प्रमाण चिंतेत भर टाकणारे ठरत आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनामुळे अनेक मुलांवरून आई-वडिलांचे छत्र हरपलं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला असून, अनाथ मुलांसाठी पीएम केअर्स फंडातून १० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. यावरून निवडणूक रणनितिकार प्रशांत किशोर यांनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे.
सरकार केवळ आश्वासनं देतं. परंतु मदत देण्याच्या वेळी अयशस्वी ठरतं असल्याचं प्रशांत किशोर म्हणाले. "मोदी सरकराचा आणखी एक मास्टरस्ट्रोक. यावेळी कोविज आणि त्याच्या खराब व्यवस्थापनामुळे फटका बसलेल्या मुलांसाठी सहानुभूती आणि देखभालीची परिभाषा व्याख्या तयार केली जात आहे. अशा वेळी जेव्हा मुलांना अधिक मदतीची आवश्यकता असते, तेव्हा त्यांना वयाच्या १८ व्या वर्षी वेतनाचे आश्वासन दिलं, त्याबद्दल त्यांना सकारात्मक वाटलं पाहिजे का?," असा सवाल प्रशांत किशोर यांनी केला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला.
"पंतप्रधान कार्यालयाला आपण धन्यवाद केलं पाहिजे जे आम्हाला आयुष्यमान भारतच्या योजनांमध्ये नामांकित करतात. जेणेकरून ५० कोटी भारतीयांच्या आरोग्यासंबंधीच्या गरजांना पूर्ण केलं जाऊ शकेल. परंतु गरज भासल्यावर ऑक्सिजन आणि बेड देण्यातही ते अयशस्वी ठरतात," असंही त्यांनी नमूद केलं.
- Be grateful to #PMCares for PROMISE of free education; a RIGHT guaranteed by the Constitution/RTE
— Prashant Kishor (@PrashantKishor) May 30, 2021
- Thank @PMOIndia for ASSURANCE to be enrolled in Ayushman Bharat that supposedly covers healthcare needs of 50Cr Indians but only FAILED to provide bed/oxygen when needed (2/2)
सरकारनं जाहीर केली होती मदत
ज्या मुलांचे दोन्ही पालक किंवा सांभाळकर्ते कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत, अशा सर्व मुलांना १८ वर्षांचे झाल्यानंतर स्टायपेंड म्हणजे निश्चित रक्कम देण्यात येईल. तसंच ही मुलं २३ वर्षांची झाल्यानंतर पीएम केअर्स फंडातून १० लाख रुपये दिले जातील, असं पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलं आहे. याशिवाय या सर्व मुलांना आयुषमान योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांचा विमा मोफत उपलब्ध करून दिला जाणार असून, १८ वर्षांपर्यंत याचे सर्व हप्ते पीएम केअर्स फंडातून भरले जातील, असंही पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
तसेच दोन्ही पालकांचं छत्र हरवल्यामुळे जी मुलं अनाथ झाली आहेत. त्यांना मोफत शिक्षण दिलं जाणार असून, उच्च शिक्षणासाठी पीएम केअर्स फंडातून मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिक्षणासाठी लागणाऱ्या कर्जाचे हप्ते पीएम केअर्स फंडातून भरले जातील, असंही पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.