बिहारमध्ये केजरीवालांच्या साथीत प्रशांत किशोर यांचा राजकीय प्रयोग ?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 12:59 PM2020-02-17T12:59:07+5:302020-02-17T12:59:22+5:30
प्रशांत किशोर यांना बिहारमध्ये जातीवादाचा फटका बसू शकतो. मात्र केजरीवाल यांच्या सोशल इंजियनिरींगमधून यावरही तोडगा निघू शकतो. याआधी जेपींनी घडविलेल्या परिवर्तनाच्या वेळी जातीवाद गौण ठरला होता. त्यामुळे प्रशांत किशोर आणि केजरीवाल यावर तोडगा काढतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
नवी दिल्ली - बिहार राज्य नेहमीच राजकीय बदलांसाठीची प्रयोगशाळा मानले जाते. आता पुन्हा एकदा बिहारमध्ये नवीन राजकीय प्रयोग उदयास येण्याची शक्यता आहे. या प्रयोगाचे नेतृत्व राजकीय तज्ज्ञ प्रशांत किशोर करण्याची शक्यता आहे. या संदर्भात ते मंगळवारी घोषणा करणार असल्याचे समजते.
आपल्या राजकीय कारकिर्दीविषयी किशोर 11 फेब्रुवारी रोजीच भूमिका स्पष्ट कऱणार होते. मात्र त्याच दिवशी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल होता. त्यामुळे त्यांनी घोषणा करणे टाळले. केजरीवालांच्या दिल्लीतील यशात प्रशांत किशोर यांचे योगदान राहिले आहे. त्यांच्या इंडियन पॉलिटीकल एक्शन कमिटीने केजरीवालांच्या प्रचारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. केजरीवालांनी भाजपचा धुव्वा उडवत 70 पैकी 62 जागा जिंकल्या.
काही दिवसांपूर्वीच अनेक मुद्दांवरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि प्रशांत किशोर यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर किशोर यांची जदयूमधून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र आता नितीश कुमार यांच्याविरुद्धच किशोर बिहारमध्ये शड्डू ठोकण्याची शक्यता व्यक्त कऱण्यात येत आहे. नितीश यांच्यासमोर किशोर फार कमकुवत आहेत. मात्र 'आप'चा फॉर्म्युला बिहारमध्ये लागू केल्यास किशोर यांच बळ वाढू शकते. किंबहुना बिहारमध्ये 'आप' आणि प्रशांत किशोर यांच्यामुळे नवीन समिकरण उदयास येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रशांत किशोर यांना बिहारमध्ये जातीवादाचा फटका बसू शकतो. मात्र केजरीवाल यांच्या सोशल इंजियनिरींगमधून यावरही तोडगा निघू शकतो. याआधी जेपींनी घडविलेल्या परिवर्तनाच्या वेळी जातीवाद गौण ठरला होता. त्यामुळे प्रशांत किशोर आणि केजरीवाल यावर तोडगा काढतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.