प्रसून जोशी यांच्या कात्रीला पहलाज निहलानींची धार, अध्यक्षपदी येताच पंजाबी चित्रपटावर घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 12:22 PM2017-08-23T12:22:10+5:302017-08-23T12:28:38+5:30

‘तूफान सिंह’ चित्रपटावर बंदी घालण्याचा प्रसून जोशी यांचा निर्णय अनेकांसाठी धक्का ठरला आहे

Prasoon Joshi bans Punjabi film | प्रसून जोशी यांच्या कात्रीला पहलाज निहलानींची धार, अध्यक्षपदी येताच पंजाबी चित्रपटावर घातली बंदी

प्रसून जोशी यांच्या कात्रीला पहलाज निहलानींची धार, अध्यक्षपदी येताच पंजाबी चित्रपटावर घातली बंदी

Next

मुंबई, दि. 23 - चित्रपटावर बंदी घालणे तसंच सीन्सवर कात्री चालवणे यामुळे नेहमी वादात राहिलेल्या पहलान निहलानी यांची सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन गच्छंती केल्यानंतर आतातरी चित्रपटसृष्टीला मोकळा श्वास घ्यायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र त्यांच्या जागी निवड करण्यात आलेल्या प्रसून जोशी यांनी धारदार कात्री घेऊनच सुत्रं हाती घेतल्याचं दिसत आहे. प्रसून जोशी यांनी अध्यक्षपदी येताच पंजाबी चित्रपट ‘तूफान सिंह’वर बंदी घातली आहे. पहलाज निहलानी यांना अध्यक्षपदावरुन हटवल्यानंतर प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांनी चित्रपटावर बंदी घालत चांगलाच झटका दिला आहे.

‘तूफान सिंह’हा पंजाबी चित्रपट असून बाघेल सिंह यांनी त्याचं दिग्दर्शन केलं आहे. रणजीत बावा याने चित्रपटातील मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर, देशाची व्यवस्था आणि राजकारणातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी अभिनेता दहशतवादी कारवायांचा आधार घेतो, अशी कथा आहे. मात्र चित्रपटातील दृश्य हिंसक असल्याचं सांगंत सेन्सॉर बोर्डाने ही बंदी घातली आहे. महत्वाचं म्हणजे 4 ऑगस्ट रोजी ‘तूफान सिंह’ भारताबाहेर प्रदर्शित झाला आहे. 

'चित्रपटात अनेक हिंसक दृश्य दाखवण्यात आली आहे. तूफान ही व्यक्तिरेखा हिंसक असून तो राजकारणी आणि पोलिसांची निर्घृण हत्या करताना दाखवण्यात आलं आहे. तूफान या व्यक्तिरेखेची तुलना भगत सिंह यांच्याशी करण्यात आली आहे. अशा हिंसक आणि क्रूर चित्रपटांचं समर्थन केलं जाऊ शकत नाही', असं मत सेन्सॉर बोर्डाने व्यक्त केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 

11 ऑगस्ट रोजी पहलाज निहलानी यांना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं होतं. त्यांना हटवल्यानंतर सुरु असलेली कट-कट आता तरी संपेल असा विश्वास चित्रपटसृष्टीकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र ‘तूफान सिंह’ चित्रपटावर बंदी घालण्याचा प्रसून जोशी यांचा निर्णय अनेकांसाठी धक्का ठरला आहे.

जानेवारी 2015 मध्ये पहलाज निहलानी यांची सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. 23 सदस्यांच्या सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी आल्यापासून पहलाज निहलानी वादात राहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले 'अॅक्शन हिरो' असल्याचं सांगत त्यांनी स्तुतीसुमनं उधळली होती. पहलाज निहलानी यांना सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेतल्याचीही चर्चा होती. 

Web Title: Prasoon Joshi bans Punjabi film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.