मोदी सरकारकडून शिंदे गटाला केंद्रात मोठी जबाबदारी, प्रतापराव जाधवांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 09:31 AM2022-10-06T09:31:25+5:302022-10-06T09:32:17+5:30
Prataprao Jadhav News: जून महिन्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
नवी दिल्ली - जून महिन्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यादरम्यान, ४० आमदारांसोबत शिवसेनेतील १२ खासदारही शिंदेगटात दाखल झाले होते. त्यानंतर शिंदेगटाला केंद्रात मंत्रिपद आणि इतर मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील, असे सांगण्यात येत होते. दरम्यान, आता मोदी सरकारने शिंदे गटाला केंद्रात मोठी जबाबदारी सोपवली आहे.
मोदी सरकारकडून शिंदे गटाला केंद्रात पहिली जबाबदारी सोपवण्यात आली असून, माहिती तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतापराव जाधव हे बुलडाण्याचे खासदार आहेत. ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शिंदेगटासोबत आलेल्या १२ खासदारांमध्ये प्रतापराव जाधव यांचाही समावेश होता. आता स्थायी समितीमध्ये केलेल्या बदलांनंतर केंद्रातील मोदी सरकारने प्रतापराव जाधव यांना माहिती तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त केले आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिंदे गटातील ९ जणांना स्थान देण्यात आले होते. तसेच केंद्र सरकारमधील मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिंदे गटाला एक-दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.