राम मंदिर आठ कोटी हिंदूंच्या घामाच्या पैशाने बांधले आहे, कोणी एकट्याने नाही - प्रवीण तोगडिया
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 06:10 PM2024-02-01T18:10:59+5:302024-02-01T18:11:33+5:30
२२ जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
२२ जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामललाचा अभिषेक सोहळा पार पडला. रामभक्तांच्या देणगीतून हे भव्य राम मंदिरात उभारण्यात आले आहे. राम मंदिराचा कारभार सांभाळण्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराबद्दल बोलताना आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी सांगितले की, अयोध्येतील भगवान प्रभू श्री रामाचे भव्य मंदिर हे कोणा एका व्यक्तीच्या पैशाने बांधले गेले नाही तर देशातील आठ कोटी हिंदूंच्या कष्टाच्या पैशातून उभारण्यात आले आहे. ते मथुरा येथे बोलत होते.
आठ कोटी हिंदू बांधवांनी मंदिराच्या बांधकामासाठी १९८९ मध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमेत १.२५ रूपयांची देणगी दिली होती. तोगडिया बुधवारी वृंदावन येथील आश्रमात माध्यमांशी बोलत होते. तोगडिया म्हणाले की, उत्तर प्रदेशातील अयोध्येत बांधलेले राम मंदिर हे हिंदूंच्या विजयाचे स्मारक आहे. १९८९ साली आठ कोटी हिंदूंनी हे मंदिर बांधण्यासाठी प्रत्येकी १.२५ रुपयांची देणगी दिली होती, त्यामुळे हे मंदिर कोणा एका व्यक्तीच्या पैशाने नाही तर आठ कोटी हिंदूंच्या घामाच्या पैशाने बांधण्यात आले आहे.
राम मंदिर ८ कोटी हिंदूंच्या घामाच्या पैशाने - तोगडिया
तसेच १९८९ मध्ये पैसे मिळाल्यानंतर मंदिराचे बांधकाम सुरू करण्यासाठी आम्ही २४० बाय १२० फूट पायथ्याचे भव्य मंदिर तयार केले आणि दगडी कोरीव काम सुरू केले. मागील ३२ वर्षांत ६० हजार घनफूट दगड देणगीतून मिळालेल्या पैशातून बनवण्यात आला, असे त्यांनी सांगितले. तोगडिया यांनी दावा केला की, सध्या जे मंदिर बांधले जात आहे, त्याचा ५४ हजार घनफूट पाया त्याच पैशातून तयार करण्यात आला आहे, त्यामुळे हे मंदिर १.२५ च्या पैशांतून ५४ हजार घनफूट दगडाने बनवले गेले आहे असे म्हणता येईल. म्हणूनच राम मंदिर उभारणीसाठी आठ कोटी हिंदूंच्या घामाचा पैसा लागला आहे.
ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा सुरू करण्याच्या वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयावरही तोगडिया यांनी भाष्य केले. काशी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीमध्ये भगवान काशी विश्वनाथाची पूजा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याबद्दल तोगडिया म्हणाले की, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद या आदेशाचे स्वागत करत आहे. १९९३ पूर्वी देखील तिथे पूजा व्हायची. न्यायालयाच्या या आदेशानंतर राम मंदिराप्रमाणेच काशी आणि मथुरेत पुन्हा भव्य मंदिरे बांधली जावीत आणि भारतात हिंदूंच्या श्रद्धेचा आदर केला जावा, अशी आमची इच्छा आहे.