मोदीजी, आधी बसू मग बोलू; प्रवीण तोगडिया नरमले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 11:21 AM2018-03-02T11:21:02+5:302018-03-02T11:23:31+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असताना मोदी आणि तोगडिया यांच्यात चांगली मैत्री होती. मात्र, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर या दोघांमध्ये वितुष्ट आले.
अहमदाबाद: विश्व हिंदू परिषदेचे (विंहिप) आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरून होळीच्या शुभेच्छा दिल्या. यापूर्वी प्रवीण तोगडिया यांनी अनेकदा केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. मात्र, या ट्विटमधील त्यांचा सूर काहीसा मवाळ दिसून आला. नरेंद्र मोदी, होळीच्या शुभेच्छा! होळीच्यानिमित्ताने पुन्हा एकदा हॅप्पी होली! चला, पुन्हा एकदा एकत्र बसून बोलुया?, असे तोगडिया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असताना मोदी आणि तोगडिया यांच्यात चांगली मैत्री होती. मात्र, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर या दोघांमध्ये वितुष्ट आले. त्यानंतर घडलेल्या काही प्रसंगांमुळे ही दरी आणखी रुंदावली होती. या पार्श्वभूमीवर तोगडिया यांनी केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर सरकारच्या अनेक धोरणांवर जाहीर टीका केली होती. काही दिवसांपूर्वी एका खटल्याप्रकरणी पोलीस तोगडीया यांना अहमदाबादमध्ये अटक करण्यासाठी गेले होते. मात्र, त्यावेळी तोगडिया संपूर्ण दिवस गायब झाले होते. त्यानंतर ते एका रुग्णालयात बेशुद्धाअवस्थेत सापडले होते. या घटनेनंतर तोगडिया यांनी राजस्थान पोलिसांना आपला एन्काऊंटर करायचा होता, असा आरोप केला होता. मात्र, तोगडिया यांच्या कालच्या ट्विटमध्ये त्यांचा सूर कमालीचा मवाळ झालेला दिसत आहे. त्यामुळे आता तोगडिया मोदींशी समझोता करायला तयार असल्याचे संकेत मिळत आहेत.
@narendramodi शुभ होली, भाई! होली पर फिर से एक बार Happy Holi ! चलो, एक बार फिर से मिलबैठकर बातें करें? होली है!
— Dr Pravin Togadia (@DrPravinTogadia) March 1, 2018